अनियमित पावसामुळे हंगामाचे बदलले रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:23+5:302021-09-11T04:16:23+5:30
येवला : सातत्याने दुष्काळी व विषम पाणीपुरवठ्याने तीन भागात विभागलेला तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत ...
येवला : सातत्याने दुष्काळी व विषम पाणीपुरवठ्याने तीन भागात विभागलेला तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत तालुक्यात झालेल्या जलसंधारण कामांमुळे तालुक्याचा खालावलेला जलस्तर काहीसा उंचावला आहे. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश शेती व्यवसाय हा आजही नैसर्गिक जलस्रोतावरच अवलंबून आहे. पडणारा पाऊस अन् काही भागात मिळणारे पाटाचे पाणी यावरच तालुक्यातील शेती टिकून आहे. यात अस्मानी व सुल्तानी संकटाशी सामना करताना शेती अन् शेतकरीही सातत्याने अडचणीत आले आहेत.
पारंपरिक शेतीत अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केली जात असली तरी वाढत्या महागाईचा फटका शेतीला बसला आहे. तर गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारी व लहरी पावसाने शेती आणि शेतकरी दोन्ही उद्ध्वस्त झाले आहेत. तालुक्यात बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, कांदा ही नगदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. अनियमित पावसाने तालुक्यातील हंगामाचे चित्रही बदलून टाकले आहे. हंगामातील पिकेही आता तीन टप्प्यांत पाहायला मिळतात. दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीही बळीराजाला करावी लागली आहे. तालुक्यात चालू खरीप हंमागात ४० हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर मका, १७ हजार ५१७ हेक्टर क्षेत्रावर कांदा, १० हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर मूग, ४ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, २ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, तर ३२१ हेक्टरवर तूर पीक घेण्यात आले आहे. नियमित पिकांना समाधानकारक भाव मिळेलच, याची शाश्वती नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून भाजीपाला उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. भाजीपाल्यासाठी कमी पाणी आणि मशागत देखील कमी लागत असल्याने कमी वेळेत अधिक उत्पादन म्हणून भाजीपाला पिकांकडे पाहिले गेले. यातून हिरवी मिरची, मेथी, कोथिंबीर, वांगे, टमाटे, सिमला मिरची आदी भाजीपाला पिके घेतली गेली. तालुक्यात सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पीक घेतले गेले आहे.
कांद्यास देशांतर्गत व परदेशात मागणी सर्वसाधारण राहिली. इतर राज्यांमध्ये उपलब्ध झालेला कांदा तसेच कांदा निर्यात खुली असली तरी पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा आपल्या कांद्यापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यातून हमीभावाने कांदा खरेदी करण्याची मागणी पुढे येत आहे. भाजीपाला पिकांच्या आवकेत वाढ झाल्याने व देशांर्तगत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला पिकांबाबतही शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे.
तालुक्यातील पश्चिम व दक्षिण भागात पाटपाण्यावर तर उत्तर-पूर्व भागात नैसर्गिक जलस्रोतांवरच शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षांत गारपीट, वादळी व जोरदार पावसाचा फटका शेतीला बसला.
इन्फ...
उत्पन्नात घट होण्याची शक्यता
पिकवलेल्या व हाती आलेल्या पिकाला बाजारात भाव मिळत नसल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरला आहे.
शासनाच्या कृषी विभागाकडून मका, बाजरी, कापूस, सोयाबीन पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, शेतकरी बैठका, डिजिटल माध्यमातून मार्गदर्शन, बियाणे बीजप्रक्रिया व कीडनियंत्रणासाठी अनुदान, पीकविमा योजना, तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुदान, कांदाचाळ आदी उपक्रम, योजना राबविण्यात आल्या आहेत. तालुक्यात खरीप हंगामात ५ हजार २४१ इतका पीकविमा काढण्यात आला आहे. सद्य:स्थितीत काही भागात सोयाबीनला शेंगा लागल्या असून मक्याला बिट्ट्या आल्या आहेत. तर कांदा लागवडही सुरू आहे. तालुक्यातील सर्वच पिके रोगराईला बळी पडत असल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी पावसाअभावी तर काही ठिकाणी अति पावसाने पिके धोक्यात आल्याचे चित्र आहे. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फोटो- १० येवला खबरबात
100921\10nsk_36_10092021_13.jpg
फोटो- १० येवला खबरबात