समाजमाध्यमांचा बेजबाबदार वापर घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:31 AM2018-03-25T00:31:13+5:302018-03-25T00:31:13+5:30
आजच्या आधुनिकतेच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापरात बेजबाबदार व बेभानपणा अधिक वाढत असून, तो समाजाच्या जडणघडणीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना समाजाच्या जडणघडणीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत एक सुजाण नागरिक म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे,
नाशिक : आजच्या आधुनिकतेच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापरात बेजबाबदार व बेभानपणा अधिक वाढत असून, तो समाजाच्या जडणघडणीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना समाजाच्या जडणघडणीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत एक सुजाण नागरिक म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असा सूर ‘माध्यमवेध’ चर्चासत्रातून उमटला.
सिंधूताई मोगल संदर्भ ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य न्यास, नाशिक सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘माध्यमवेध’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शंकराचार्य संकुलात झालेल्या या चर्चासत्राप्रसंगी शेफाली वैद्य, अॅड. सुशील अत्रे यांनी सहभागी होत समाजमाध्यमांचा वापरातील बेजबाबदारपणा यावर मंथन घडवून आणले. यावेळी वैद्य यांनी आपले मत मांडताना सांगितले, सोशल मीडिया हा अनियंत्रित आहे; मात्र पारंपरिक मीडिया नियंत्रित स्वरूपाचा असूनदेखील अतीउत्साहीपणे एखाद्या घटनेचे वार्तांकन करत चुकीच्या बातम्या दिल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. भविष्यात ‘डेटा थेफ्ट’ हे आव्हानात्मक ठरणार असून, आतापासून सावध होणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवरील एखादी माहिती पुढे पाठविण्यापूर्वी सत्यता तपासून घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. लेखी किंवा तोंडी स्वरूपात एखादी व्यक्ती अथवा संस्थेविषयी टीका करणे किंवा बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे हा गुन्हा ठरतो. तसेच मजकूर पुढे ‘फॉरवर्ड’ केला तरीदेखील लिखाण करण्याइतकीच शिक्षा व त्याच स्वरूपाचा गुन्हा ठरतो, असे अत्रे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन शरदमणी मराठे यांनी केले.
माहितीचा महापूर
समाजमाध्यमांमधून विविध विषयांवरील माहितीचा महापूर दररोज ओसंडून वाहत असतो. त्यामुळे अनावश्यक व कुठलाही आधार नसलेली बेभरवशाच्या माहितीची देवाण-घेवाण सोशल मीडियाद्वारे होऊ लागली असून, ही समाजाच्या दृष्टीने हितावह तर मुळीच नाही; मात्र चिंताजनक बाब नक्कीच आहे. त्यामुळे आपण या समाजाचे सुजाण नागरिक आहोत, याची जाणीव ठेवून सुरक्षित व सतर्कपणे सोशल मीडिया हाताळावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.