सौर कृषी पंपामुळे सिंचन झाले सुलभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 05:40 PM2018-11-16T17:40:37+5:302018-11-16T17:40:54+5:30
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील शेतकरी संजय बोडके यांनी सौर कृषी पंपाचा वापर करुन आपली बागायती शेती फुलविली आहे. शेततळ्यातील पाणी कृषी पंपाच्या सह्याने शेताला देता येत असल्याने उन्हाळी कांद्यालाही त्याचा लाभ होत आहे.
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील शेतकरी संजय बोडके यांनी सौर कृषी पंपाचा वापर करुन आपली बागायती शेती फुलविली आहे. शेततळ्यातील पाणी कृषी पंपाच्या सह्याने शेताला देता येत असल्याने उन्हाळी कांद्यालाही त्याचा लाभ होत आहे.
सिन्नरसारख्या कमी पावसाच्या भागात सिंचनासाठी विहिर किंवा शेततळ्याचा उपयोग केला जातो. वीजेची उपलब्धता वेळेवर न झाल्याने सिंचन प्रक्रीयेत समस्या निर्माण होतात. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली. योजना सुरू झाल्यावर शेतकरी त्यावर विश्वास करायला तयार नव्हते.
बोडके यांचेकडे दोन विहीरी आणि शेततळे होते. मात्र वीजेच्या लपंडावामुळे पिकांना वेळेवर औषधे व पाणी देणे शक्य होत नसे. त्यामुळे बोडके यांनी २०१६ मध्ये सौर कृषी पंपासाठी अर्ज केला. त्यांच्या या ‘धाडसा’बद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.
तीन हॉर्सपॉवरच्या कृषी पंपाची किंमत साधारण चार लाख रुपये होती. शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावयाची असल्याने बोडके यांनी २० हजार २५० रुपये महावितरणच्या कार्यालयात भरले. जैन सोलर पंपच्या प्रतिनिधींनी स्वत: कृषी पंप शेतात बसवून दिला. कक्ष अभियंता सुदर्शन सुर्यवंशी यांनी बोडके यांना योजनेबाबत चांगले मार्गदर्शन केले. दिवसा सिंचनाची सुविधा झाल्याने शेत फुलायला लागले. द्राक्षाचे क्षेत्र साडेतीन एकराने वाढले. सोयाबीनसोबत टमाटे आण िकांदे शेतात पिकू लागले. बोडके यांना शेताला पाणी देण्यासाठी वीजेची वाट पहावी लागत नसल्याने कृषी कामांनी देखील वेग घेतला आहे. भविष्यात बागायती क्षेत्र वाढविता येईल असा विश्वास त्यांच्या मनात कृषी पंपामुळे निर्माण झाला आहे.