नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट
By दिनेश पाठक | Published: July 2, 2024 10:39 AM2024-07-02T10:39:43+5:302024-07-02T10:39:56+5:30
मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता.
दिनेश पाठक /नाशिक : पावसाळा सुरू हाेऊन एक महिना उलटला तरी वरूणराजा धो धो बरसलेला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जलसंकट अधिक तीव्र झाले आहे. मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये 2 जुलैअखेर केवळ ७.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेचा पाणीसाठा २२.५६ टक्के इतका होता. यंदा कडाक्याच्या उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन वेगात झाले असून १५ टक्के साठा मागील वर्षाच्या तुलनेने कमी झाला आहे. मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता.
जूनमध्ये झालेल्या अगदी तुरळक पावसाने धरणांमधील पाणी साठ्यात कोणतीच वाढ झालेली नाही. हा पाऊस सर्वत्र मुसळधार झाला तर पाण्याचा प्रश्न थोडा सुटेल. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा १९.१७ टक्के आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पोलिस बंदोबस्तात पाणी साेडण्यात आले. पाणीसाठ्यावर आपला हक्क सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाण्याच्या कारणाने संघर्ष पेटला.मात्र तरी देखील गंगापूर धरणात केवळ पंधरा टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील भोजापूर, नागासाक्या, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, भावली, ओझरखेड, माणिकपुंज ही धरणे कोरडी पडली आहेत. सर्वात मोठ्या अशा गिरणा धरणातही केवळ नऊ टक्के पाणी असून नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील 180 गावेही या धरणावर अवलंबून आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांत अजूनही टॅंकरने पाणी पुरवठा केला जातोय.