आठ वर्षांपासून रखडली जलसिंचन योजनेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 12:33 AM2021-06-02T00:33:50+5:302021-06-02T00:36:36+5:30
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.
तुकाराम रोकडे
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सन २०१३-१४ साली मंजुरी मिळालेल्या देवगांव परिसरातील सामुंडी, खरोली, आळवंड, डहाळेवाडी, आव्हाटे, चंद्राची मेंट आणि देवगांव आदी गावांतील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसून, संबंधित योजनेची कामे बाळगली असून, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, बोजवारा उडालेल्या कामांचा ठेकेदारांनी बिल काढून काम पूर्ण दाखविल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलसंधारण प्रकल्पांतर्गत जलसिंचन योजनेचे २२ कोटी रुपयांची कामे सन २०१३-१४ साली मंजूर झाली होती. मात्र, आजतागायत कोणत्याही गावात काम पूर्ण न झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, देवगांव परिसरातील कामांचा आढावा दौरा करून अधिकाऱ्यांना जलसिंचनाची कामे तत्काळ पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले, तसेच ठेकेदारांची कानउघाडणी करून शेतकऱ्यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनल पाटील, उपकार्यकारी अभियंता सचिन धूम, संपत सकाळे, काँग्रेस नेते गोपाळ लहांगे, काँग्रेस युवक नेते निकलेश दोंदे, लक्ष्मण खाडे, सुनील बांगरे, आमदारांचे स्वीय सहायक जयराम मोंढे, चंद्राचीमेटचे सरपंच राजू चंद्रे, संतोष निरगुडे, ठेकेदार व शेतकरी उपस्थित होते.
कोट...
मागील नागपूरच्या अधिवेशनात सदर प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजना पूर्ण करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून दिरंगाई होत असलेल्या कामाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला केला, तसेच मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सदर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर
जलसिंचनाची कामे मंजूर असलेली गावे...
सामुंडी - ३ कोटी ( ७०% अपूर्ण)
खरोली - ३.५ कोटी - (५५० एकर क्षेत्र)
आळवंड - ३ कोटी (५०० एकर क्षेत्र )
डहाळेवाडी - ३.५ कोटी (५०० एकर क्षेत्र)
आव्हाटे - ३.१७ - कोटी (२१८ हेक्टर पैकी १०० एकर सिंचनाखाली)
चंद्राचीमेट/ देवगांव - ६.५ कोटी (१,१०० एकर क्षेत्र)