अलर्ट! 500, 2 हजारांच्या नव्या करकरीत नोटा घेताय?; वेळीच व्हा सावध अन्यथा बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:35 PM2022-02-17T15:35:54+5:302022-02-17T15:37:12+5:30

बाजारात बनावट नोटा आणल्या जात नाहीत, असे मुळीच नाही. चोरी-छुप्या पद्धतीने बनावट नोटा बाजारात मूळ व्यवहारांमध्ये आणल्या जात असल्याचे ...

Is your Rs 2000 And Rs 500 note fake? Here's how to check | अलर्ट! 500, 2 हजारांच्या नव्या करकरीत नोटा घेताय?; वेळीच व्हा सावध अन्यथा बसेल मोठा फटका

अलर्ट! 500, 2 हजारांच्या नव्या करकरीत नोटा घेताय?; वेळीच व्हा सावध अन्यथा बसेल मोठा फटका

googlenewsNext

बाजारात बनावट नोटा आणल्या जात नाहीत, असे मुळीच नाही. चोरी-छुप्या पद्धतीने बनावट नोटा बाजारात मूळ व्यवहारांमध्ये आणल्या जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. चलनी नोटांपैकी पाचशे, दोन हजारांच्या नोटा बनावट निघण्याचे प्रमाण अधिक आहे. या दोन चलनी नोटांमध्ये अनेकदा नागरिकांना संशय येतो. नोटाबंदीच्या अगोदर व नंतर चलनी नोटांशी साम्य असलेल्या बनावट नोटा मुख्य चलनात आणण्याचे बहुतांश प्रकार शहर व ग्रामीण भागात घडले होते. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचा साठा जप्तही केला होता. २०१७ ते २०२० सालापर्यंत पोलिसांकडून अशा प्रकारच्या धडक कारवाया केल्या गेल्या.

नाेटाबंदीनंतर नकली नोटांची प्रकरणे

१) कलर प्रिंटिंगचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद पडल्याने बनावट चलनी नोटांचा छापखाना सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार सप्टेंबर महिन्यात सुरगाणा तालुक्यात उघडकीस आला होता. नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त करत एकूण सात जणांना अटक केली होती.

२) या छापखान्याचे धागेदोरे लासलगावजवळील विंचूरपर्यंत असल्याचेही पोलिसांनी शोधले होते. अटक केलेल्या आरोपींनी या छापखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो बनावट नोटा छापल्याची माहिती पुढे आली होती.

३) लासलगावातून चौघांना पाचशेे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी बेड्या ठोकल्या होत्या. यामध्ये डॉक्टर महिलाही सहभागी होती.

पाचशे, दोन हजारांच्या नकली नोटा अधिक

राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण विभागानेही नकली नोटांच्या बाजाराविषयी चिंता व्यक्त केली आहे. पाचशे व दोन हजारांच्या नोटांची नक्कल सहजरित्या शक्य होत असल्यामुळे या नोटा मोठ्या प्रमाणात बनावट स्वरुपात चलनामध्ये आणल्या जात असल्याकडे लक्ष वेधले होते. यामुळे २ हजारांची नोट अधिक सुरक्षित असल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल ठरला आहे.

एटीएममधून बनावट नोटा हाती आल्या तर....

बनावट नोट एटीएममधूनही हाती पडू शकते. यावेळी घाबरुन जाऊ नये. कारण आरबीआयने काही नियम व अटी जाहीर केल्या आहेत. त्यांचे पालन करणे सर्व बँकांना बंधनकारक आहे. बनावट नोट बँकेला स्वीकारावी लागते. कारण नोटांचा भरणा यंत्रात करण्यापूर्वीच एका विशेष मशिनद्वारे नोटा अस्सल चलनी असल्याची खात्री पटवून घेतलेली असते.

नोटा अस्सल असल्याचे असे ओळखा

प्रत्येक नोटेवर एक अनुक्रमांक असतो. तो छापताना नव्या रचनेत प्रत्येक अक्षर किंवा अंक चढत्या आकारात छापलेला असतो. ही तजवीज नुकतीच आरबीआयकडून करण्यात आली आहे.

नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र ‘वॉटरमार्क’च्या स्वरूपात विरुद्ध बाजुनेही पाहावयास मिळते.

नोटेमध्ये सुरक्षा धागा असतो. यावर पृष्ठभागावर हिंदीमध्ये 'भारत' असे तर पार्श्वभागावर 'आरबीआय' असे लिहिलेले असते.

नोटेवरील सुरक्षा धागा हा नेहमी महात्मा गांधींच्या चित्राच्या डाव्या बाजूला असतो, हे लक्षात घ्यावे.

 

Web Title: Is your Rs 2000 And Rs 500 note fake? Here's how to check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा