जिल्हा विकासाला इस्रोचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:47 AM2018-12-15T01:47:46+5:302018-12-15T01:48:02+5:30
विज्ञानाचा वापर करून जिल्ह्याच्या विकासासाठी ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्था व राष्टÑीय रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर कृषी, रस्ते, वन व शहरी विकास या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी व इस्रोच्या शास्त्रज्ञ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
नाशिक : विज्ञानाचा वापर करून जिल्ह्याच्या विकासासाठी ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्था व राष्टÑीय रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर कृषी, रस्ते, वन व शहरी विकास या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी व इस्रोच्या शास्त्रज्ञ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
शहराची कशाप्रकारे वाढ झाली त्याचे चित्रीकरण करण्याबरोबरच, नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजनांचे या माध्यमातून नियोजन शक्य होणार आहे. किती हेक्टर जमिनीवर द्राक्ष, कांदा, भाजीपाला घेण्यात आला याची माहिती मिळणे सुकर झाले असून, त्याच्या आधारे भविष्यात कोणती पिके घ्यावीत याचा अंंदाज बांधणे सुकर होणार आहे.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी, हे तंत्रज्ञान जिल्ह्यासाठी उपयोगी पडणार असून, पारदर्शी कारभार व गरजेनुसार कामे करण्यास ते मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले, जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी, विविध प्रकल्प राबविण्यासाठी या आराखड्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले.
देशपातळीवर एखाद्या जिल्ह्याचा मायक्रो आराखडा इस्रोच्या मदतीने करण्याचा हा पहिलाच प्रयोग असून, यापूर्वी इस्रोने विविध मंत्रालये, प्राधिकरणांसाठी आपली सेवा खुली करून दिली आहे. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून उपग्रहाद्वारे चित्रण करण्यात आले. त्यात कृषी क्षेत्रातील द्राक्ष लागवडीखालील क्षेत्राची नोंद घेण्यात आली तर रस्ते विकासाठी सध्याच्या रस्त्याची अवस्था, चांगले व वाईट रस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला तर वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने वन खात्याच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यावरील अतिक्रमण याची अद्ययावत माहितीही संकलित झाली आहे.