घरपट्टी हाच अविश्वास ठरावात कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:29 AM2018-08-29T01:29:22+5:302018-08-29T01:29:37+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावास अनेक कारणे असले तरी सत्तारूढ भाजपाने करवाढ हा मुद्दा कळीचा केला असून, आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे पूर्वी दोन हजार रुपये घरपट्टी असेल तर ती आता १२ हजारांवर येईल, अशी माहिती दिली आहे.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावास अनेक कारणे असले तरी सत्तारूढ भाजपाने करवाढ हा मुद्दा कळीचा केला असून, आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे पूर्वी दोन हजार रुपये घरपट्टी असेल तर ती आता १२ हजारांवर येईल, अशी माहिती दिली आहे. दुसरीकडे माकपाच्या वतीनेदेखील आयुक्तांची भेट घेऊन करवाढीला विरोध करण्यात आली असून, ती रद्द केल्यास कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशीच पक्ष असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे, तर कॉँग्रेस पक्षानेदेखील अशीच भूमिका मंगळवारी (दि. २७) जाहीर केली आहे. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर त्याविषयी विविध मते व्यक्त करण्यात येत असली तरी करवाढ हाच कळीचा मुद्दा सर्व पक्षियांनी केला आहे. विशेषत: भाजपाने त्यावर भर दिला असून करवाढ लादल्याने सामान्य नागरिक, शेतकरी, उद्योजक व्यावसायिकांना मोठा धक्का बसणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मंगळवारी (दि.२८) यासंदर्भात महापौर रंजना भानसी यांनी नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले.
सर्वच क्षेत्रांतील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी लढा असल्याचे त्यांनी सांगितले. माकपाच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, अॅड. तानाजी जायभावे, अॅड. वसुधा कराड, सचिन मालेगावकर आणि दिनेश सातभाई यांनी आयुक्त मुंढे यांची भेट घेतली. शहरातील मोकळ्या भूखंडावर चाळीस पैसे कर आकारणीबाबत घेतलेला निर्णय अत्यंत अन्यायकारक असून तो पाच पैसे आणल्याबाबतचे आदेश त्वरित पारीत करावेत, शहरात शेतजमिनींचे दोन प्रकार असून काही जमिनी एन ए (नॉन अॅग्रीकल्चर) झाल्या आहेत. अशा मोकळ्या भूखंडांवर कर असावा मात्र शहरातील ज्या शेतजमिनी शेतकºयांच्या ताब्यात आहेत, त्यावर कोणत्याही प्रकारे कर लावू नये, असे झाल्यास पक्षाची तीव्र हरकत असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्तव्यदक्ष अधिकाºयांच्या पाठीशी राहण्याची पक्षाची भूमिका असली तरी नाशिककरांवर अन्याय होऊ नये यासाठी करवाढ करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. कॉँग्रेस पक्षानेदेखील करवाढीच्या मुद्द्याला हात घातला आहे. नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादता कामा नये अशी पक्षाची भूमिका असून, तुकाराम मुंढे यांनी करवाढ मागे घेतल्यास अविश्वास ठरावाचे समर्थन केले जाणार नसल्याचे पक्षाचे गटनेता शाहू खैरे यांनी स्पष्ट केले.
बहुतांशी पक्ष व्हीप बजावणार
तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाला पक्षीय भूमिकेनुसार मतदान व्हावे यासाठी बहुतांशी पक्ष वरिष्ठांशी संपर्क साधून व्हीप बजावणार आहे. भाजपाची शुक्रवारी पक्ष बैठक असून, त्या दिवशीही अशाच प्रकारे पक्षादेश बजावण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
दोन हजार रुपयांची घरपट्टी आता ११ हजार ८३० रुपये
महापालिका आयुक्तांनी केलेल्या करवाढीमुळे किती आर्थिक ताण पडेल याचा तक्ता भाजपाने सादर केला असून, भरमसाठ करवाढ होत असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार ज्या निवासी सदनिकेचे क्षेत्रफळ ७४.४१ चौरस मीटर आहे. त्यांना सध्याच्या ५.५० पैसे चौमी प्रतिदराने २ हजार १२० रुपये घरपट्टी येत होती. मात्र आता आयुक्तांनी नवा दर २२ रुपये चौरस मीटर असा केल्याने घरपट्टी थेट ११ हजार ८३० रुपये इतकी येईल.
व्यावसायिक कारणांच्या याच क्षेत्रफळाच्या बांधकामावर पूर्वी १९ रुपये ८० पैसे दराने ९ हजार २१४ रूपये घरपट्टी येत होती ती आता ७९ रुपये प्रती चौरस मीटर दराने ५२ हजार रुपये येईल. २५९ चौ.मी. मोकळ्या भूखंडास पूर्वी ०.३३ पैशांप्रमाणे ४३१ रुपये घरपट्टी होती मात्र आता २ रुपये २० पैसे दराने ती ४ हजार १२४ रुपये येईल.
एकर शेत जमिनींना ६५ हजार ५७८, तर शाळेची अवघी शंभर चौरस मीटर जागा पकडल्यास सध्याच्या दराने २७३२ रुपये तर नव्या २२ रुपयांच्या दराने १४ हजार ९६९ रुपये इतकी पट्टी येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.