ध्वज उतरवण्याचा वाद आणखी चिघळला
By admin | Published: September 20, 2015 11:22 PM2015-09-20T23:22:17+5:302015-09-20T23:22:56+5:30
‘दिगंबर’वर आगपाखड : इष्टदेवतांच्या स्थापनेमुळे निर्वाणी व निर्मोही आखाडे ध्वज ‘जैसे थे’ ठेवणार
नाशिक : येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ‘उत्तर रामायण’ आता चांगलेच रंगात आले असून, प्रमुख आखाड्यांतील ध्वज उतरवण्यावरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळला आहे. दिगंबर आखाड्याने त्र्यंबकेश्वरमधील शैवांचे स्नान होण्यापूर्वीच ध्वज उतरवून आगाऊपणा केला असून, हा अपराध सहन केला जाणार नाही, असा इशारा श्री महंत ग्यानदास यांनी दिला, तर दुसरीकडे दिगंबर आखाड्याने मात्र आपण योग्य तेच केल्याची भूमिका मांडली. दरम्यान, यंदा साधुग्राममध्ये इष्टदेवतांची कायमस्वरूपी स्थापना झाल्याने निर्वाणी व निर्मोही या दोन्ही आखाड्यांनी आपले ध्वज ‘जैसे थे’च ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.
गेल्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममधील तिन्ही अनी आखाड्यांत दिमाखात ध्वजारोहण सोहळा झाला होता. कुंभमेळा संपल्यानंतर सदर ध्वज विधिवत उतरवले जातील, असे तेव्हा सांगण्यात आले होते. त्यानुसार तृतीय शाहीस्नान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच दिगंबर आखाड्यातील श्री महंतांनी एकत्र येत ध्वजाचे पूजन करून ध्वज उतरवला. निर्वाणी व निर्मोही आखाड्याच्या महंतांना हे कळताच ते संतप्त झाले. तिन्ही आखाड्यांचे एकत्र ध्वजारोहण झाले होते. त्यामुळे तिन्ही आखाड्यांनी एकत्र येऊनच ध्वज उतरवायला हवेत.
ध्वज उतरवण्याचा विधी असतो. याशिवाय तिन्ही आखाड्यांना महापालिका प्रशासनाने इष्टदेवतांसाठी कायमस्वरूपी चबुतरे बांधून दिल्याने चरणपादुका तेथेच असताना ध्वज उतरवले जाऊ शकत नाहीत, असे या दोन्ही आखाड्यांचे म्हणणे होते.
दरम्यान, या विषयावरूनच आज श्री महंत ग्यानदास यांनीही दिगंबर आखाड्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. दिगंबर आखाड्याला परंपरा माहीत नाही. त्र्यंबकेश्वर येथील शैवांचे स्नान होण्यापूर्वीच ध्वज उतरवून त्यांनी पळ काढला आहे. त्यांच्या या अपराधाला क्षमा करणार नाही, असे त्यांनी सांगितले. याशिवाय यंदा साधुग्राममध्ये इष्टदेवतांची कायमस्वरूपी स्थापना झाल्याने निर्वाणी व निर्मोही आखाड्याचे ध्वज ‘जैसे थे’ ठेवले जाणार असून, ते उज्जैनचा कुंभमेळा झाल्यावर जीर्ण झाल्यास बदलले जातील, असा पवित्राही त्यांनी घेतला. (प्रतिनिधी)