विधिमंडळातही गाजला नाशिकच्या गुन्हेगारीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 01:22 AM2021-12-26T01:22:58+5:302021-12-26T01:25:06+5:30
विधिमंडळ अधिवेशनात नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी चमकदार कामगिरी केली, असे काही दिसले नाही. संसदेच्या अधिवेशनातही फार काही वेगळे घडले नाही. तरीही नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलाच. सीमा हिरे यांनी भाजप नेता अमोल ईघे याच्या खुनाचा मुद्दा उपस्थित केला. युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी नाशिकपाठोपाठ विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दोन विषयांमुळे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेची चर्चा राज्याच्या राजधानीत झाली. सामान्य नागरिकाच्या हिताचे विविध उपक्रम राबविणाऱ्या पोलीस दलाने भयमुक्त वातावरणासाठी पावले उचलायला हवी, अशी आता सामान्यांची अपेक्षा आहे.
म लिंद कुलकर्णी कायदा-सुव्यवस्था धोक्यात वाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा आग्रह, भूमाफियांचा उपद्रव कमी करण्यासाठी मोक्काची कारवाई, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया व्यापाऱ्यांकडून रक्कम वसुली यासारखे जनहिताचे उपक्रम पोलीस दलाने राबविले. जनतेनेदेखील त्यांच्या या पुढाकाराचे भरभरून कौतुक केले. मात्र, भयमुक्त वातावरण नसेल तर सामान्य माणसाचे जगणे असह्य बनेल. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अंगणातील महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले जाण्याच्या घटना नित्य घडत आहेत. मालेगावमध्ये महिनाभरापूर्वी दंगल घडली असताना तेथे पोतेभर तलवारी सापडतात. खुनाच्या घटना, दोन गटात सशस्त्र हाणामाऱ्या असे प्रकार नित्य घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. सामान्य जनतेला ‘पोलिसिंग’ दिसायला हवे. अधिवेशनापेक्षा निवडणुकीला महत्त्व ६ नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम आटोपली. आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून स्थगित झालेल्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ ११ जागा असल्या तरी बहुमतासाठी एकेक जागेचे महत्त्व असल्याने राजकीय पक्ष पुन्हा या निवडणुकीला गांभीर्याने घेतल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारखे मंत्री निवडणूक प्रचारात उतरले, यावरून सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने या निवडणुकीला किती महत्त्व होते, हे लक्षात घ्यावे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना डॉ. भारती पवार या प्रचारात व्यस्त होत्या. आदिवासी भागातील नगरपंचायतींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. जिंकण्यासाठी प्रशिक्षण उपयोगी पडेल? नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षीयांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. कॉंग्रेसचे प्रभारी दत्त गेल्या आठवड्यात येऊन गेले. त्यांनीही निवडणुकीसाठी समित्या गठित करण्याचे सूतोवाच केले. यापूर्वी शिवसेनेने समिती गठित केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात युवा सेनेचे राज्य अधिवेशन नाशकात होऊ घातले आहे. वरुण सरदेसाई यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर युवा सेनेत चैतन्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपनेदेखील इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले. नगरसेवक व इच्छुक उमेदवार त्याला उपस्थित होते. पट्टीचे प्रशिक्षक भाजपमध्ये आहेतच. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, युवासेनेचे अधिवेशन आणि भाजपच्या प्रशिक्षणाचा निवडणुकीत खरोखर उपयोग होईल का? तिथली समीकरणे तर वेगळीच असतात ना! सिन्नरमध्ये भाऊबंदकी आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या गावातील संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. यात काही विशेष नाही. आमदार म्हणून त्यांचा तालुक्यात दबदबा असताना स्वत:च्या गावात यश मिळविणे कठीण नाही. पण स्वत:चा भाऊ विरोधात असताना कोकाटे यांनी हे यश मिळविले. पण त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. आमदारांचे बंधू भारत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली. यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करणार असल्याची घोषणा केली. भारत यांचे सध्या शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. आमदार कन्या सिमंतिनी ज्या देवपूर गटातून निवडून आल्या, त्या गटासाठी भारत कोकाटे इच्छुक आहेत. भाऊबंदकीचा हा खरा वाद आहे.