पेठ-दिंडोरीत प्रांतवादाचा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:40 AM2019-10-16T01:40:31+5:302019-10-16T01:43:40+5:30
दिंडोरी व पेठ तालुका मिळून असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने दहा उमेदवार रिंगणात होते. आजी-माजी आमदारांमध्ये तिरंगी लढत झाली होती. यंदा मात्र आमदार नरहरी झिरवाळ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार रामदास चारोस्कर व धनराज महाले हे मैदानातून बाहेर असून, झिरवाळ यांना शिवसेनेचे भास्कर गावित यांच्याशी सरळ सामना करावा लागणार आहे.
भगवान गायकवाड
दिंडोरी व पेठ तालुका मिळून असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने दहा उमेदवार रिंगणात होते. आजी-माजी आमदारांमध्ये तिरंगी लढत झाली होती. यंदा मात्र आमदार नरहरी झिरवाळ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार रामदास चारोस्कर व धनराज महाले हे मैदानातून बाहेर असून, झिरवाळ यांना शिवसेनेचे भास्कर गावित यांच्याशी सरळ सामना करावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अरुण गायकवाड आपल्याकडे किती मते खेचतात अन् प्रांतवादात पारंपरिक मतांची कोण कशी बेरीज-वजाबाकी करतो, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
गेल्यावेळी युती आघाडी न होता सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे धनराज महाले व काँग्रेसचे रामदास चारोस्कर यांच्यात लढत झाली होती. झिरवाळ यांनी १३ हजाराच्या मताधिक्याने बाजी मारली होती. माकप व मनसेने चांगली मते खेचली होती. यंदा पाच उमेदवार रिंगणात आहेत. माकप यंदा रिंगणात नाही. प्रमुख लढत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ व शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात होणार आहे. वंचित आघाडीचे अरुण गायकवाड हेही स्पर्धेत उतरले आहेत.
गेल्यावेळी राष्ट्रवादीत नरहरी झिरवाळ व रामदास चारोस्कर यांच्यात तिकिटांची स्पर्धा होती मात्र आघाडी तुटल्यावर चारोस्कर यांनी काँग्रेसचा हात धरत उमेदवारी केली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले धनराज महाले व नरहरी झिरवाळ यांच्यात स्पर्धा होईल असे चिन्ह होते, मात्र महाले यांनी शिवसेनेत घरवापसी केल्याने झिरवाळ यांचा मार्ग मोकळा झाला होता. शिवसेनेत उमेदवारीची मोठी स्पर्धा होती. अखेरीस भास्कर गावित यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. चारोस्कर, महाले यांना पुनर्वसनाचा शब्द देत त्यांना कामाला लावले असले तरी, अप्रत्यक्षरीत्या कोणाकडून कोणाला किती मदत होते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ ३३० मतदान केंद्रांचा आहे. दोन्ही तालुक्यातील प्रमुख उमेदवार असल्याने प्रांतवादाचा मुद्दाही प्रचारात डोकं वर काढत आहे.
मतदारसंघातील
कळीचे मुद्दे
मागील पाच वर्षात मतदारसंघात झालेली विकासकामे.
४दिंडोरी आणि पेठ या दोन्ही तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची समस्या आणि विजेचे प्रश्न.
४वळण योजना, बंधाऱ्यांची कामे, आरोग्य व शैक्षणिक सुविधा.
दोन माजी आमदार, माकपाची भूमिका महत्त्वाची
माजी आमदार रामदास चारोस्कर व धनराज महाले यांनी या निवडणुकीत जोरदार तयारी करत समर्थकांची चांगली मोट बांधली होती; मात्र दोघांच्या भांडणात भास्कर गावित यांचा लाभ झाल्याने महाले-चारोस्कर यांच्या समर्थकांची नाराजी लपून राहिलेली नाही. काही समर्थकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. दोघेही माजी आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला हजर होते, त्यांना उद्धव ठाकरे यांनी पुनर्वसनाचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. माकपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यांची एक गठ्ठा मते कितपत पडतात यावर विजयाचे गणित ठरेल.
बदललेली समीकरणे
पूर्वी पेठ तालुका सुरगाणा तालुक्याला जोडलेला होता. तेव्हा कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पेठ तालुका दिंडोरी मतदारसंघाला जोडला गेला. त्यानंतर मात्र येथील राजकीय समीकरणे बदलली.
पेठ आणि दिंडोरी मिळून हा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. पेठ तालुका मागास, तर दिंडोरी तालुका काहीसा विकसित तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील समस्या वेगवेगळ्या आहेत त्याचेही किती प्रतिबिंब पडते याबाबत औत्सुक्य आहे.
विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ हे पुन्हा एकदा आपल्या विकासाचे कार्ड घेऊन मतदारांसमोर जात आहेत. तर शिवसेना उमेदवाराकडून प्रांतवादाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला जात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमधील लढत चुरशीची बनली आहे.