‘इस्त्रो’ देणार नाशिकच्या स्मार्ट विकासाला दिशा : पी.जी.दिवाकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:25 PM2017-08-14T22:25:25+5:302017-08-14T22:25:43+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (इस्त्रो) संशोधनाचा नागरीक्षेत्राच्या विकासासाठी वापर करण्याचे ठरविले आहे.
नाशिक : भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (इस्त्रो) संशोधनाचा नागरीक्षेत्राच्या विकासासाठी वापर करण्याचे ठरविले आहे. उपग्रहांच्या आधारे वैविध्यपूर्ण वापर देशाच्या प्रगतीसाठी होत असून, नाशिकच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकासासाठी इस्त्रोच्या माध्यमातून तयार होणारा प्रकल्प मार्गदर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन इस्त्रोचे वैज्ञानिक सचिव डॉ. पी. जी. दिवाकर यांनी केले.
‘इस्त्रो’ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन आणि विकास कार्यशाळेप्रसंगी दिवाकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अंतराळ संशोधनाचे योगदान देण्याची संधी मिळाली आहे. विविध राज्यांतील विकासासाठी नियोजनामध्ये इस्त्रोच्या संशोधनाचा वापर प्रभावी ठरला आहे. भारतीय पुरातत्व विभागासह तेलंगाना, कर्नाटक राज्यांसाठी केलेल्या कार्याचा विस्तार मोठा आहे. जिल्हास्तरावर प्रथमच इस्त्रो संशोधनाचा वापर नागरी विकासाच्या दृष्टीने करीत आहे. या विशेष प्रकल्पासाठी डॉ. सुरेश राव व डॉ. उदय राज यांच्यासह शास्त्रज्ञांचे पथक जिल्हा प्रशासनासोबत कार्यरत राहणार असल्याचे दिवाकर यांनी यावेळी सांगितले. नाशिकच्या विकासामध्ये ‘इस्त्रो’च्या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न करत विविध संकल्पना मांडल्या. त्यांच्या संकल्पनांचा विचार नक्कीच केला जाईल, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. याप्रसंगी ‘भुवन’च्या भुवन -पंचायत, भुवन ३डी, भुवन डॉट एनआरएससी आदी अॅप्लिकेशन्सचे उपग्रहांद्वारे प्राप्त नकाशे, प्रतिमा आदींचे थेट सादरीकरण केले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप , इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. उदय राज , डॉ.गिरीशकुमार , श्रीनिवासन , डॉ.यशवंत राव , डॉ. मंजुनाथन , डॉ. सुरेश राव , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उप वनसंरक्षक माणिकनंदा रामानुजम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदि उपस्थित होते.