इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेमुळे यशाला ‘चार चाँद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:55 AM2019-07-23T00:55:18+5:302019-07-23T00:58:58+5:30
खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.
नाशिक : खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. जगात केवळ तीनच देशांना यापूर्वी हे यश प्राप्त झाले असून, त्यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश असल्याने इस्त्रोच्या या यशाने खरोखरच ‘चार चाँद’ लावले असल्याची भावना नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केली.
भारतासाठी सोमवारचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीहरीकोटा येथील घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनीदेखील आनंद व्यक्त करीत भारताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताने अन्य राष्टÑांच्या तुलनेत अत्यल्प खर्चात या यशाला गवसणी घातली असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.
तांत्रिक बिघाड वेळीच लक्षात येऊन त्यावर सात दिवसात तोडगा काढत चांद्रयान दोन मोहिमेत मिळविलेले यश अद्वितीय आहे. विशेष म्हणजे आधी चंद्रावर पोहोचण्यास ५२ दिवसांचा कालावधी लागणार होता, पण अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या ऊर्जेने आणि यान झेपावल्याने त्याला आता ४८ दिवसच लागणार आहेत. अतिरिक्त वेग मिळालेला असल्याने आता पृथ्वी आणि चंद्राभोवती ५ ऐवजी ४ फेऱ्या मारून यानावरील लॅँडर चंद्रावर उतरविले जाणार आहे. या यशाबाबत सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
- अविनाश शिरुडे, अध्यक्ष, स्पेस इंडिया सोसायटी
चांद्रयान -२ च्या प्रारंभिक दोन टप्प्यांत मिळालेले यश अतुलनीय आहे. विशेष म्हणजे हे यान पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून, इस्त्रोसह देशासाठी ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. प्रारंभीचे दोन टप्पे भारतीय चांद्रयानने यशस्वीपणे पूर्ण केले असून, अखेरच्या टप्प्यात चंद्रावर लॅँडर उतरविण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अध्वर्यू विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे अभियान होत असल्याने त्यांच्याच नावावरून त्याचे नाव ‘विक्रम लॅँडर’ असे ठेवण्यात आले असून, यापुढील संपूर्ण अभियानही यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.
- गिरीश पिंपळे, खगोलतज्ज्ञ
चांद्रयान मिशनच्या दुसºया पर्वात भारताने आणि इस्त्रोने मिळविलेले यश ऐतिहासिक असून, त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. यापूर्वीच्या तिन्ही देशांनी चंद्राच्या उत्तर धृवावर लॅँडर आणि रोव्हर उतरविले होते. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण धृवावर रोव्हर आणि लॅँडर पाठविणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. दक्षिण धृवावर पाणी सापडण्याची शक्यता अधिक असल्यामुळेच भारताने दक्षिण धृवाची निवड केली आहे. या मोहिमेमुळे भारताला मून मॅपिंग आणि अन्य माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
अपूर्वा जाखडी, खगोलतज्ज्ञ
इ