अकरावी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणेही शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:32 AM2019-06-04T00:32:44+5:302019-06-04T00:33:06+5:30
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यात दहावीच्या निकालानंतर एखाद्या विद्यार्थ्याने अकरावीसाठी प्रवेश अर्ज केला असताना त्याला डिप्लोमा व इतर विद्याशाखांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाल्यास पालकांच्या लेखी अर्जाद्वारे अकरावीसाठी केलेला प्रवेश अर्ज त्याला मागे घेऊन अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणेही शक्य होणार आहे.
नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यात दहावीच्या निकालानंतर एखाद्या विद्यार्थ्याने अकरावीसाठी प्रवेश अर्ज केला असताना त्याला डिप्लोमा व इतर विद्याशाखांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाल्यास पालकांच्या लेखी अर्जाद्वारे अकरावीसाठी केलेला प्रवेश अर्ज त्याला मागे घेऊन अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणेही शक्य होणार आहे.
त्याचप्रमाणे एका फेरीत एकाच शाखेचा किमान एक ते जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येईल. एकाच फेरीत विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या शाखांचे पसंतीक्रम भरता येणार नसल्याने गुणवत्ता यादीत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
गुणवत्ताधारक विद्यार्थी डिप्लोमा आणि अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतही सहभागी होतात. परंतु, डिप्लोमासाठी चांगले महाविद्यालय मिळाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी केलेला अर्ज तसाच प्रलंबित राहिल्याने गुणवत्ता यादीत असे विद्यार्थी कायम राहत असल्याने मागील विद्यार्थ्यांची अनेकदा चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी चुकते. असे प्रकार कमी करण्यासाठी यावर्षीपासून शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अन्य विद्या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेल्याने इतर विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांत प्रवेशाची संधी मिळू शक णार आहे. यासोबतच अकरावी प्रवेशप्रक्रियेत शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशातील आरक्षण तक्त्यातही बदल झाला आहे. यात इनहाउस कोटा २० टक्क्यांहून १० टक्के करण्यात आला आहे, तर व्यवस्थापन कोटा ५ आहे. शहरातील ११ अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांत अल्पसंख्याकांसाठी ५० टक्के कोटा आहे. द्विलाक्षी तथा बायोफोकल अभ्यासक्रमासाठी २५ टक्के कोटा असूनही कोट्यांतर्गत प्रवेश पूर्ण केल्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रिया होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाचे बदल
कोणत्याही स्तरावर लिखित अर्जाद्वारे प्रवेश अर्ज मागे घेण्याची सुविधा.
महाविद्यालयांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करता येणार नाही.
एका फेरीत एक प्रवेश अर्जाद्वारे एकच शाखेची मागणी करता येईल.
किमान एक व कमाल दहा महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार.
दुसºया फेरीपासून पसंतीक्रम बदलताना ते कितीही देता येतील.