साधुसंतांच्या तपामुळेच देश अक्षयवटाप्रमाणे उभा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:37+5:302021-07-16T04:12:37+5:30
नाशिक : आपल्या देशावर अनेक आघात व आक्रमणे झाली. अनेक मोहजाल टाकल्या गेले तेव्हा हा देश बुडेल, हा सनातन ...
नाशिक : आपल्या देशावर अनेक आघात व आक्रमणे झाली. अनेक मोहजाल टाकल्या गेले तेव्हा हा देश बुडेल, हा सनातन हिंदू धर्म टिकणार नाही असे अनेकांना वाटले. मात्र संत, महापुरुषांच्या तपश्चर्येमुळे हा देश अक्षयवटाप्रमाणे उभा राहिला, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी काढले.
नाशिक येथे आयोजित स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. येथील नक्षत्र लाॅन्स येथे पार पडलेल्या या सोहळ्यात स्वामी सवितानंद अमृत महोत्सव समितीतर्फे ‘सविता अर्घ्य’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना भागवत यांनी मोक्ष हा धर्मासोबत चालणारा असून मोक्ष हा आध्यात्मिक साधना व पुरुषार्थ असल्याचे सांगितले. जोपर्यंत शरीर असते तोपर्यंत अर्थ व काम या दोन्ही गोष्टी असतात. मात्र त्यांना अनुशासित करण्यासाठी धर्म असतो. तो धर्मच सगळ्या समाजास एकसंध ठेवतो असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी मानपत्र, महावस्त्र, व पुष्पहार घालून डाॅ. भागवत यांनी स्वामी सवितानंद यांचा अमृत महोत्सवी सत्कार केला. यावेळी साधकांचे मार्गदर्शन करतांना स्वामी सवितानंद यांनी ‘मी समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. प्रत्येकाने समाज व देशाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा, तेव्हाच ईश्वर मिळतो असे प्रतिपादन स्वामी सवितानंद यांनी केले. डाॅ. कपिल चांद्रायण यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन, तर वैद्य योगेश जिरांगलीकर यांनी आभार प्रदर्शन केले.
इन्फो
सैनिक कल्याण निधीसह राम जन्मभूमी न्यासला देणगी
सविता अर्घ्य या स्मरणिकेत देशभरातील स्वामी साधकांच्या ६०पेक्षा जास्त लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या स्मरणिकेचे चार भागांत विभाजन करण्यात आले आहे. याप्रसंगी स्वामी सवितानंद सेवा समितीतर्फे सैनिक कल्याण निधीस तीन लाख, तर श्रीराम जन्मभूमी न्यासला तीन लाख रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला.
फोटो
१५भागवत सवितानंद
स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त त्यांना मानपत्र प्रदान करताना सरसंघचालक मोहन भागवत.