संमेलनामुळे नाशिकच्या साहित्य चळवळीला चालना मिळण्याचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:35+5:302021-01-09T04:11:35+5:30

नाशिक : नाशिक जिल्ह्याला दीड दशकांनंतर पुन्हा साहित्य संमेलनाचा मान मिळाल्याने, जिल्ह्यातील साहित्यिक आणि मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे, ...

It is believed that the Sammelan will give a boost to the literary movement in Nashik | संमेलनामुळे नाशिकच्या साहित्य चळवळीला चालना मिळण्याचा विश्वास

संमेलनामुळे नाशिकच्या साहित्य चळवळीला चालना मिळण्याचा विश्वास

Next

नाशिक : नाशिक जिल्ह्याला दीड दशकांनंतर पुन्हा साहित्य संमेलनाचा मान मिळाल्याने, जिल्ह्यातील साहित्यिक आणि मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे, तसेच नाशिकचे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला. नाशिकमधील नवीन पिढीला मराठीतील अनमोल साहित्याचे आणि नामवंत साहित्यिकांचे दर्शन, तसेच अनुभव जवळून घेता येणार असून, त्यामुळे नाशिकमधील साहित्य चळवळीला चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

नाशिकमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाने नाशिकच्या युवा साहित्यिकांना, नवीन काही लिहू इच्छिणाऱ्यांच्या प्रतिभेला अधिक धुमारे फुटून साहित्य चळवळ अधिक जोमात वाढेल, असा विश्वासही साहित्यिक आणि मान्यवरांनी व्यक्त केला.

---

नाशिकला साहित्याची मोठी परंपरा असून, अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहेत. त्यामुळे नाशिकला पुन्हा संमेलनाचा मान मिळाला, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नाशिकमधील हे संंमेलन ऐतिहासिक व्हावे, यासाठी प्रयत्न करू, तसेच देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांचा योग्य मान, सन्मान ठेवला जाईल.

छगन भुजबळ, पालकमंत्री

-------

लोकहितवादी मंडळाने प्रातिनिधिकरीत्या निमंत्रण दिले असले, तरी नाशिकमधील सर्व संस्था आणि रसिकांचे या संमेलन आयोजनात योगदान राहणार आहे. लक्ष्मीबाई टिळकांपासून सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर ते सध्याच्या प्रतिभावान लेखकांपर्यंत नाशिकला मोठी साहित्य परंपरा असल्याने, नाशिकला संमेलन होणार, ही सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. ही निवड सार्थकी लावू, असा विश्वास वाटतो.

हेमंत टकले, विश्वस्त, लोकहितवादी मंडळ

-----

महाराष्ट्र स्थापनेच्या हिरक महोत्सवी वर्षात हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. संमेलनासाठी लोकहितवादी मंडळातर्फे निमंत्रण देण्यात आले असले, हे संमेलन तमाम नाशिककरांचे आहे. या निमित्ताने नाशिककरांना परिवर्तनाची दिशा देणारे साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असून, सामूहिक प्रयत्नांतून संमेलन आयोजन यशस्वी करू, असा विश्वास आहे.

जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

--------

साहित्य आणि संस्कृतीच्या जोपासनेच्या दृष्टीने संमेलन नाशकात होण्याची वार्ता ही खूपच आनंदाची बाब आहे. नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेला हे संमेलन अधिक समृद्ध करेल. जिल्ह्यातील अधिकाधिक युवा वर्गाने या संमेलनाचा लाभ घेऊन आपल्या साहित्यिक जाणिवा समृद्ध करून घेतल्यास त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल.

गो. तु. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक

-------------

नाशिकच्या साहित्य चळवळीसाठी ही आनंदाची बाब असून, या चळवळीला बळकटी देण्याचे कार्य या संमेलनातून होईल, असा विश्वास वाटतो. या संमेलनाच्या निमित्ताने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नवसाहित्यिक अधिक प्रमाणात लिहते होतील. नवी पिढी लिहिती झाल्याने, त्यांच्या भाषेतील, विचारांतील अधिकाधिक साहित्य निर्माण होऊ शकेल.

प्रकाश होळकर, कवी आणि मसापचे जिल्हा सदस्य

-----------------------

कोरोनाच्या सावटाखाली हे संमेलन होणार असल्याने, अधिक काळजी घेऊन त्याचे आयोजन करावे लागणार आहे. मात्र, गत वर्षभरापासून साहित्यापासून वंचित राहिलेल्या रसिकांना ही एक पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. जुन्या पिढीतील कार्यकर्ते आता फारसे सक्रिय नाहीत. त्या निमित्ताने नव्या दमाची टीम निर्माण होऊन संमेलन यशस्वी करतील, हा विश्वास आहे.

नरेश महाजन, साहित्यिक

-------------

नाशिकला साहित्य संमेलन होणार असल्याचा खूप आनंद आहे. या संमेलनात होणाऱ्या चर्चा, परिसंवांदातून अनेक नवसाहित्यिकांना पुढील दिशा मिळत जाते. त्यामुळे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांचे आभार मानतानाच एक नाशिककर म्हणून माझ्याकडे काही जबाबदारी सोपवल्यास, मी ती निश्चितच पार पाडेन.

प्राजक्त देशमुख, युवा नाटककार

Web Title: It is believed that the Sammelan will give a boost to the literary movement in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.