लॉकडाऊननंतरही मुलांना घराबाहेर पाठवणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:07+5:302021-05-16T04:14:07+5:30

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र ...

It is dangerous to send children out of the house even after a lockdown | लॉकडाऊननंतरही मुलांना घराबाहेर पाठवणे धोकादायक

लॉकडाऊननंतरही मुलांना घराबाहेर पाठवणे धोकादायक

Next

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र टास्क फोर्स उभारण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपला तरी नागरिकांनी दक्ष राहून मुलांना घराबाहेर न पाठवणेच त्यांच्या हिताचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दुसऱ्या लाटेतदेखील अनेक तरुण, तरुणींना तसेच चाळिशीखालील नागरिकांना कोरोनाने मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. अनेक युवक, युवतीदेखील प्राणास मुकल्या आहेत. तसेच लहान मुलांनाही काही प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अद्याप तरी बालकांचा बळी मोठ्या प्रमाणात जाण्याच्या घटना घडत नसल्या तरी तिसऱ्या लाटेत बालकांनाच अधिक धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेड्‌स यांची तयारी करण्यात येत असून, या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहेत. या निर्देशानंतर अनेक ठिकाणी चाईल्ड कोविड सेंटर आणि हॉस्पिटल उभारण्याची तयारी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात ताप, सर्दी आणि खोकला, विशेषत्वे कोरडा खोकला, जुलाब, उलटी होणे, भूक न लागणे, कायम थकवा जाणवणे, श्वास घेताना अडचण जाणवणे या सामान्य बाबींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

इन्फो

यंदा मुलांमध्ये आढळली लक्षणे

गतवर्षी मुलांमध्ये कोरोना झाला असला तरी त्याची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती, तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. लक्षणांच्या बाबतीत हा बदल या लाटेतच दिसून आला आहे. त्यामुळे पुढील लाटेत त्याची अधिक तीव्र लक्षणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इन्फो

बिटकोसह आयएसपीत बालक रुग्णालय

तिसऱ्या लाटेत ऐनवेळी धावपळ उडू नये, यासाठी महापालिकेच्या वतीनेदेखील आतापासूनच बालकांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयांची पूर्तता करण्यावर भर दिला जात आहे. त्यात नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय तर इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या एका बंद पडलेल्या रुग्णालयातही बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठीचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.

कोट

कोराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बालके बाधित आढळण्याचे प्रमाण खूप अधिक होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत बालकांना होऊ शकणाऱ्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन त्यासाठीची पूर्वतयारी आतापासूनच करण्याची आवश्यकता आहे. तसेच पालकांनीदेखील मुलांची योग्य ती काळजी घेण्यासह त्यांना घराबाहेर न पाठवणे, त्यांना घरातच थोडासा व्यायाम करण्याची सवय लावणे तसेच प्रोटीनयुक्त आहार देण्याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे.

डॉ. सुशील पारख, बालरोग तज्ज्ञ

-------------

स्टार ७१७

Web Title: It is dangerous to send children out of the house even after a lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.