पदवीधरांचे छायाचित्र मिळणे कठीण
By admin | Published: June 22, 2016 11:46 PM2016-06-22T23:46:11+5:302016-06-23T00:03:09+5:30
घरोघरी जाण्याचा सल्ला : बीएलओ नाराज
नाशिक : पदवीधर मतदार संघातील मतदारांची छायांकित यादी करण्यासाठी त्यांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बीएलओंना घरोघरी पाठवून पदवीधरांचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक शहरात ४२ हजार पदवीधर मतदार असून, या सर्वांचे छायाचित्र गोळा करून ते मतदार यादीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पदवीधर मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनी आपले छायाचित्र संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले, परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
जून अखेर सदरचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे हाती असलेल्या दिवसात पदवीधरांना शोधणे मुश्कील काम अखेर बीएलओंकडे सोपविण्याचे ठरविण्यात आले आहे.
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात मात्र मतदारांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे. (प्रतिनिधी)