थंडी झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:15 AM2021-01-25T04:15:50+5:302021-01-25T04:15:50+5:30
दुकानांपुढील वाहनांमुळे अन्य वाहतुकीस अडसर नाशिक : गडकरी चौक ते सारडा सर्कलदरम्यान असलेल्या रस्त्यावर अनेक कार मॉलद्वारे चारचाकी वाहनांची ...
दुकानांपुढील वाहनांमुळे अन्य वाहतुकीस अडसर
नाशिक : गडकरी चौक ते सारडा सर्कलदरम्यान असलेल्या रस्त्यावर अनेक कार मॉलद्वारे चारचाकी वाहनांची तसेच काही भागात वाहनांच्या दुरुस्तीची कामे होत आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जुनी वाहने उभी असतात. ही वाहने वाहतुकीला अडसर निर्माण करीत आहेत. अनेकदा उभ्या वाहनांमुळे शाब्दिक चकमकी घडतात. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
पंचवटी परिसरात अतिक्रमण
नाशिक : पंचवटीतील पंचवटी कारंजा, निमाणी चौक परिसरातील रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आणि पोलिसांनी या भागातील किरकोळ विक्रेत्यांना हटविले होते; परंतु नूतन वर्षात कोरोनातून दिलासा मिळाल्यापासून पुन्हा या भागात किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे.
अनधिकृत फलकांनी शहराचे विद्रूपीकरण
नाशिक : शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरातींचे फलक लावून विद्रूपीकरण केले जात आहे. रस्त्यावरील चौकात तसेच विजेच्या खांबांनादेखील या अनधिकृत फलकांनी वेढले आहे. शहरातील विविध भागांत पोस्टर, भित्तिपत्रके लावून विद्रूपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सीबीएस परिसरात खासगी ट्रॅव्हल्सचा सुळसुळाट
नाशिक : सीबीएस परिसरातील रस्त्यावर विविध खासगी ट्रॅव्हल्स, खासगी वाहने उभी केली जातात. हे वाहनधारक सीबीएसकडे येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या वाहनांमध्ये येण्यासाठी अक्षरश: जागा अडवून उभे असतात. त्यात काही एजंट तर थेट सीबीएस परिसरात दाखल होऊन ग्राहकांना पळवून नेण्याचे उद्योग करतात. या वाहनधारकांवर व एजंटावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सर्व्हीस रोड बनले पार्किंग रोड
नाशिक : शहराच्या भागातून जाणारे सर्व्हीस रोड म्हणजे, जणू पार्किंग आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठीच बनवलेली जागा ठरत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. शहर परिसरात मुंबई नाका ते आडगाव नाका या भागातील दोन्ही सर्व्हिस रोडवर गॅरेजची संख्या मोठी असल्याने त्यांची वाहने ही द्वारका उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत उभी केली जात असून, सर्व्हिस रोडची अडवणूक करण्यात आली आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त
नाशिक : शहरातील अनेक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या धूर फवारणीच्या गाड्या केवळ काही विशिष्ट भागांमध्येच फिरत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, महापालिकेने याबाबत दक्षता घेऊन जास्त लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये फवारणीला प्राधान्य देण्याची मागणी केली जात आहे.