देवगाव येथील बोराचीवाडीत महिन्यापासून दाटला काळोख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:23 PM2020-07-03T22:23:51+5:302020-07-04T00:29:22+5:30
देवगाव : जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्र ीवादळ, वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने देवगाव परिसरातील बोरीचीवाडी येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड ...
देवगाव : जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्र ीवादळ, वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने देवगाव परिसरातील बोरीचीवाडी येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाला. तेव्हापासून या गावाला तब्बल एक महिन्यापासून अंधारात दिवस काढावे लागत आहेत.
महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून, रोहित्र शिल्लक नसल्याचे कारण देऊन विद्युत मंडळाने हात वर केले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाºया बोरीचीवाडी येथील नागरिक वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभारावर नाराज झाले आहेत. महावितरण विभागाने विजेची समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गावात प्रामुख्याने आदिवासी लोकवस्ती असल्यामुळे मोलमजुरी करून राहणारे लोक आहेत. आधीच लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने नागरिक आर्थिक पेचात असताना विजेच्या समस्येने त्यात भर पडली आहे. रेशन दुकानात रॉकेल मिळत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी दिव्यामध्ये गोडेतेल टाकून कशीबशी रात्र घालवावी लागते. पावसाचे दिवस असल्याने सरपटणाºया प्राण्यांकडून लहान मुले तसेच आबाल वृद्धांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित असल्याने विजेचे दर्शन केव्हा होईल, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात महावितरण विभागाने अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
एक ते दीड महिन्यापासून आम्ही अंधारात असून, त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी वणवण करीत फिरावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात मेणबत्ती, रॉकेल नसल्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे.
- देवराम जाधव, नागरिक, बोरीचीवाडी
लॉकडाऊनमध्ये आॅइलचा साठा नसल्याने ट्रान्सफार्मर-मध्ये जुने आॅइल वापरू शकत नाही, तिथे नवीनच ट्रान्सफार्मर बसवावा लागेल. आम्ही दररोज पाठपुरावा करीत असून, येत्या दोन-तीन दिवसांत ट्रान्सफार्मर बसविला जाईल.
- उद्धवेश बिरारी, उपअभियंता, त्र्यंबकेश्वर