सॉफ्टवेअर अपग्रेडेशनमुळे गेल्या पाच दिवसांपासून ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणे अवघड
By admin | Published: January 4, 2015 01:19 AM2015-01-04T01:19:53+5:302015-01-04T01:20:17+5:30
सॉफ्टवेअर अपग्रेडेशनमुळे गेल्या पाच दिवसांपासून ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणे अवघड
नाशिक : पेट्रोलियम मंत्रालयाने १ जानेवारीपासून गॅस सिलिंडरचे शासकीय अनुदान थेट ग्राहकाच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतल्याने त्या अनुषंगाने केल्या जात असलेल्या सॉफ्टवेअर अपग्रेडेशनमुळे गेल्या पाच दिवसांपासून ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणे अवघड झाले असून, सिलिंडरची नोंदणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रमांकावर नोंदणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या गॅस ग्राहकांनी आपले बॅँक खाते व आधारकार्डाची माहिती गॅस एजन्सीचालकाकडे म्हणजेच तेल कंपन्यांकडे यापूर्वीच जमा केली आहे. त्यांचे अनुदान थेट बॅँकेत जमा करण्यास १ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, ज्या ग्राहकांनी बॅँकखाते कळविले नाही त्यांनी बॅँकेत खाते उघडून त्याची माहिती गॅस एजन्सीचालकाकडे देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी आहे. १ एप्रिलपासून सर्वच गॅसग्राहकांचे अनुदान बॅँकेतच जमा करण्यात येणार असून, जे ग्राहक बॅँकेत खाते असल्याची माहिती कळविणार नाहीत, त्यांना विनाअनुदानित म्हणजेच बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे. तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे गॅस एजन्सीचालकांकडून ग्राहकांना तशी माहिती दिली जात असून, गॅसग्राहकांनीही बॅँकेत खाते उघडण्यासाठी गर्दी सुरू केली आहे. ज्या ग्राहकांनी यापूर्वी खात्याची माहिती कळविली ते व ज्यांनी माहिती कळविली नाही अशा ग्राहकांची स्वतंत्र यादी करण्याचे काम तेल कंपन्यांनी हाती घेऊन सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. परिणामी २९ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत गॅस नोंदणीच बंद करण्यात आली. तत्पूर्वीही ग्राहकांना नोंदणी केल्यानंतर तीन ते चार दिवसांनी सिलिंडर मिळत होते, त्यात पुन्हा नोंदणी बंद झाल्याने विलंबाची भर पडली आहे. तेल कंपन्यांच्या या कामाची सर्वसामान्य ग्राहकांना कल्पना नसल्याने चार दिवसांपासून भ्रमणध्वनीवरून सिलिंडरची नोंदणी करण्यासाठी लघुसंदेश पाठवूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही, तर गॅस एजन्सीचालकांकडे विचारणा केली असता त्यांनी तेल कंपन्यांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली आहे. तेल कंपनीकडे याबाबत तक्रार करण्याची कोणतीही सोय ग्राहकाला उपलब्ध नसल्याने वाट पाहण्यापलीकडे कोणतीही सोय उरलेली नाही. (प्रतिनिधी)