मानवजातीच्या समस्या श्रद्धेने सुटणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:18 AM2018-03-26T00:18:40+5:302018-03-26T00:18:40+5:30
देव, धर्म या माणसाच्या कल्पना असून, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराच्या अस्तित्वाचा एकही पुरावा मिळून येत नाही. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या श्रद्धेने सुटणार नाही, असे प्रतिपादन तत्त्वज्ञान विषयक लेखन करणारे लेखक शरद बेडेकर यांनी केले.
नाशिक : देव, धर्म या माणसाच्या कल्पना असून, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराच्या अस्तित्वाचा एकही पुरावा मिळून येत नाही. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या श्रद्धेने सुटणार नाही, असे प्रतिपादन तत्त्वज्ञान विषयक लेखन करणारे लेखक शरद बेडेकर यांनी केले. शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्यावर विवेकधारा संस्थेच्या वतीने रविवारी (दि.२५) गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात ‘नास्तिक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून शरद बेडेकर, कॉमे्रड किरण मोघे हे उपस्थित होते. यावेळी बेडेकर यांनी निरीश्वरवाद आणि ईश्वरी कल्पनेविषयी भूमिका मांडताना सांगितले, भारतात चार आणि पश्चिम आशियामध्ये चार असे एकूण आठ प्रमुख धर्म जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केले आहेत. मानवजातीला भेडसावणारे वर्तमानातील विविध प्रश्न हे श्रद्धेने सुटू शकत नाही तर विज्ञानाचा आधार घेत चिकित्सकवृत्तीने विचार केल्यास सुटतील, असे बेडेकर म्हणाले. जाती-धर्माच्या नावाने जगाच्या पाठीवर अन्याय, अत्याचार, मानवी युद्ध घडवून आणले जात असताना प्रेमळ, दयाळू देव हे सगळे का थांबवत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच पृथ्वीवरील सर्व जाती-धर्माचा ईश्वर, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म या कल्पना वेगवेगळ्या कशा असू शकतात, अशी शंकाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला जात-धर्म काहीही नसते; मात्र त्याचे संगोपनकर्ते व जन्मदात्यांमुळे त्याच्यावर जात-धर्म बिंबविला जातो. सत्यवादी दृष्टिकोनातून विज्ञानाचा आधार घेत मानवाने धर्मनिरपेक्ष नव्हे तर निरीश्वरवादी जीवनाचा स्वीकार केल्यास समाजातून सर्व दु:ख आणि समस्या नष्ट होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान, लोकेश शेवडे यांनी मुलाखतीदरम्यान, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, माणसाला नास्तिकता रूक्ष बनविते असे नाही तर आनंदी जीवन जगण्यासाठी व जीवनातील गोडवा टिकविण्यासाठी श्रध्देची नव्हे तर कलेवरील प्रेमाची गरज असते, असेही ते म्हणाले.
बुद्धिप्रामाण्य लोकांसाठी आव्हानात्मक काळ
बुद्धिप्रामाण्य लोकांसाठी आगामी काळ आव्हानात्मक आहे. मनुष्य हा कमकुवत प्राणी असून त्याच्यावर कठीण प्रसंग बेतला तर तो विचलित होतो व मग मानसिक आधारासाठी देव-धर्माचा शोध घेतो, असे किरण मोघे यावेळी म्हणाल्या. त्यामुळे ईश्वरी संकल्पनेकडे त्याचा कल जाण्याची शक्यता असते. शहीद भगतसिंग यांनी ‘मी नास्तिक का...?’ हे पुस्तक सर्वाधिक कठीण प्रसंगात लिहिले. केवळ विज्ञानवादी परंपरेचा बचाव हे नास्तिकतेचे उद्दिष्ट नाही. सण-उत्सवांचे दिवसेंदिवस होणारे उत्सवीकरण धोकादायक आहे. उत्सवीकरणातून भांडवलशाही पोसली जात असल्याचा आरोप मोघे यांनी यावेळी केला. देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न म्हणजे मानवजातीमध्ये द्वेष पसरविण्याचा डाव आहे, असा आरोप मोघे यांनी यावेळी केला.