शरद पवारांमुळेच मला उमेदवारी मिळाली - राजाभाऊ वाजे
By Suyog.joshi | Published: May 15, 2024 08:03 PM2024-05-15T20:03:43+5:302024-05-15T20:07:02+5:30
शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.१५) वणी येथे सभेला जाण्यापुर्वी ते हाॅटेल एमराल्ड पार्क येथे थांबले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
नाशिक : शरद पवार यांच्यामुळेच मला उमेदवारी मिळाली असून यापूर्वी त्यांनी मला खूप मदत केली आहे असे वक्तव्य महाविकासआघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी केले. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेपूर्वी वाजे यांनी हॉटेल एमराल्ड पार्क येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.१५) वणी येथे सभेला जाण्यापुर्वी ते हाॅटेल एमराल्ड पार्क येथे थांबले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी वाजे बोलत होते. शरद पवार यांनी माझ्याकडे माहिती मागितली. जी माहिती होती मी त्यांना दिली. त्यांनी कोणताही कानमंत्र दिला नाही. अगोदरच त्यांनी खूप मदत केली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार नितीन भोसले, हेमंत टकले, श्रीराम शेठे, सुरेश दलोड, मुन्ना अंसारी आदी उपस्थित होते.
यांनी घेतली भेट
पालघरचे आमदार सुनील भुसारा, आमदार हिरामण खोसकर, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संदीप गुळवे, संपतराव सकाळे, शिवसेनेच्या श्रद्धा दुसाने कोतवाल, संगिता सुराणा, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव आदी उपस्थित होते.
कांदा उत्पादक अडचणीत-रोहित पवार
गेल्या दहा वर्षांत देशात बेराेजगारी वाढली असून महिला असुरक्षित झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनाठी काहीच केले नाही असा टोला शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला लगावला. शरद पवार यांच्याबरोबर रोहित पवारही नाशकात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बाेलत होते. शेतमालाला भाव मिळत नसून शेतकरी देशोधडिला लागला आहे. सरकार उद्योगपतींसाठी काम करत असून त्यांना जनतेशी घेणेदेणे नाही. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. चार जूननंतरच असली नकली चेहरा कोणता हे स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.