गुरुवारी कळणार कोणाला मिळणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:10+5:302021-04-11T04:14:10+5:30
नाशिक : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित शाळांमध्ये ...
नाशिक : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित शाळांमध्ये पहिलीच्या पटाच्या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींसाठी राखीव असून नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ५४४ राखीव जागांवर कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार, याविषयीची माहिती गुरुवारी (दि.१५ ) स्पष्ट
होणार आहे.
संपूर्ण राज्यभरातील आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध ९६ हजार ६८४ प्राप्त २ लाख २२ हजार २९ अर्जांची पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे बुधवारी (दि.७) एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी लॉटरी प्रक्रियाही नेहमीप्रमाणे हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात आली. या प्रक्रियेतून प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची यादी १५ एप्रिलला संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून यासंदर्भातील मेसेज पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकांवर प्राप्त होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. त्याचप्रमाणे प्रवेशाबाबत अन्य सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून तोपर्यंत कोणीही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाबाबत कार्यालयाशी संपर्क करू नये. तसेच पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी केले आहे.
इन्फो-
आरटीई प्रवेशप्रक्रिया अंतर्गत संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत १३ हजार ३२७ अर्ज दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी ही लाॅटरी काढण्यात आली आहे. यात नाशिक शहरातील ९१ शाळांसह जिल्ह्यातील ४५० शाळांची नोंदणी झाली असून, शहरातील ९१ शाळांमध्ये १ हजार ५४६, तर उर्वरित जिल्ह्यातील ३५९ शाळांमध्ये २९९८ विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत जागा राखीव आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे १३ हजार ३२७ अर्ज प्राप्त झाले असून यात प्रवेशाची संधी मिळालेल्या पालकांची यादी १५ एप्रिलला आरटीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
.
पॉइंटर
नाशिक जिल्हा
नोंदणीकृत शाळा -४५०
उपलब्ध जागा - ४५४४
प्राप्त अर्ज १३३२७
---
महाराष्ट्र राज्य
नोंदणीकृत शाळा -९४३२
उपलब्ध जागा -९६,६८४
प्राप्त अर्ज - २,२२,०२९