रेमडिसीवर आता अवघ्या बाराशे रुपयांत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:34+5:302021-03-19T04:14:34+5:30
नाशिक- कोरोनावरील उपचारासाठी सध्या वापरले जात असलेले रेमडिसीवर इंजेक्शन रुग्णाला माफक दरात उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ...
नाशिक- कोरोनावरील उपचारासाठी सध्या वापरले जात असलेले रेमडिसीवर इंजेक्शन रुग्णाला माफक दरात उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मांडलेल्या संकल्पनेला नाशिक शहरातील सहा औषध विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला असून त्यामुळे आता या विक्रेत्यांकडून अवघ्या १२०० रुपयांत रेमडिसीवर मिळणार आहे. त्याच प्रमाणे शहरातील १७ रुग्णालयांनी आपल्या आवारातील औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदीची सक्ती नसल्याचे फलक देखील लावले आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा रचग्ण पुन्हा वाढू लागले असून त्यामुळे उपचारासाठी वापरण्यात आलेल्या या इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्त माधुरी पवार यांनी पुढाकार घेतला आणि संकल्पना मांडली. त्याला विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी नाशिकमध्ये अशाच प्रकारे कोरेाना टीपेला असताना रेमडिसीवरचा काळा बाजार झाला होता. त्यावेळी २३०० रुपयांचे इंजेक्शन सहा हजार रुपयांना विकले गेले होते. त्यामुळे यंदा अशी वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करण्यात आले असून त्यासाठी अन्न व औषध प्रशासाने केले होते. त्यानंतर नाशिकमध्ये सहा विक्रेत्यांनी या इंजेक्शनची किरकोळ विक्री १२०० रुपयांपेक्षा अधिक दराने करणार नाही तसेच अव्याहत पुरवठ्याची तयारी दर्शवली आहे. अर्थात इंजेक्शन हवे असणाऱ्या रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तसेच डॉक्टरांची चिठ्ठी आणि रुग्णाचे आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे.
इन्फो.
अनेक रुग्णालयात औषधांची दुकाने असून तेथूनच औषधे घ्यावीत अशी सक्ती केली जाते. मात्र आता अशाप्रकारे सक्ती न करण्याच्या आवाहनाला शहर आणि जिल्ह्यातील एकूण १७ रुग्णालयांनी प्रतिसाद दिला असून त्यांनी आपल्या आवारातील औषधांच्या दुकानांच्या दर्शनी भागात ‘रुग्ण/त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधे घेऊ शकतात’ असे फलक लावले आहेत.