पक्षप्रमुखाला दोषी ठरविणे चुकीचे
By Admin | Published: February 11, 2015 11:36 PM2015-02-11T23:36:51+5:302015-02-11T23:37:27+5:30
मुख्यमंत्री : भाजपाच्या दिल्लीतील पराभवामुळे आनंद झालेल्या विरोधकांवर टीका
नाशिक : भारतीय जनता पक्षाने केंद्राबरोबरच राज्यांतील निवडणुकांमध्ये यश मिळविले; मात्र दिल्लीत पक्षाला अपयश आले म्हणून पक्षप्रमुखाला दोषी ठरविणे चुकीचे आहे़ तसेच या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या विरोधकांनी हे लक्षात ठेवावे की, दुसऱ्याच्या घरातील मुलाचा आनंद फार काळ साजरा करता येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली़ महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत ते बोलत होते़
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत, तर भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या़ यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच अनेक पक्षांनी मोदी लाट कमी झाल्याची वक्तव्ये केली होती़ याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये आम्ही जिंकलो अन् एका राज्यामध्ये हरलो़ जिंकलो त्याचा आनंद साजरा केला, तर हरलो त्याबाबत आत्मपरीक्षण करू़ त्यामुळे विरोधकांनी अशाप्रकारे मूल्यमापन करणे चुकीचे आहे़
एखाद्या ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष हरला म्हणजे पक्ष प्रमुखाला कसे दोषी धरणार? भाजपाच्या या पराभवाबाबत विरोधी पक्षांकडून आनंद व्यक्त केला जात आहे़ या पराभवाबाबत आम्ही आत्मचिंतन करणार आहोत़ तसेच पराभवाकडून विजयाकडे जाण्याचा पक्षाचा इतिहास असून, जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा मिळवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला़ जीवनातील चांगल्या-वाईट अशा दोन्ही वेळा जो सोबत राहतो तो सहकारी असतो़ जीवनात जेव्हा मागे येण्याची वेळ येते, त्यावेळी सहकाऱ्याने सोबत राहण्याची आवश्यकता असते़
असा टोला लगावून दिल्ली पराभवानंतर टीका करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे सहकाऱ्याची भूमिका समजावून सांगितली़
दिल्लीतील निवडणुकीनंतर शिवसेनेने केलेल्या टीकेबाबत अप्रत्यक्षपणे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यावेळी आपण सहकारी म्हणून भूमिका पार पाडीत असतो, त्यावेळी सहकाऱ्याने चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही वेळेस सोबत राहायचे असते़ जीवनात कधी-कधी अशा प्रकारची वेळ येते की, थोडे मागे यावे लागते, त्यावेळी जो आपल्यासोबत असतो तो सहकारी़ अशा प्रसंगी सहकाऱ्याने आपल्यासोबत असावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.