जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक साहित्याचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:28 AM2018-12-13T00:28:25+5:302018-12-13T00:28:49+5:30
तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मानवी जीवनाचे भाष्यकार जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक मूळ साहित्य आणि त्याला अनुरूप अशा छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि. १४) ते रविवार (दि. १६) असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.
नाशिक : तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मानवी जीवनाचे भाष्यकार जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक मूळ साहित्य आणि त्याला अनुरूप अशा छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि. १४) ते रविवार (दि. १६) असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.
कृष्णमूर्ती अभ्यास मंडळ नाशिक यांच्या वतीने जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन गेल्या वर्षी भरविण्यात आले होते. त्याला नाशिककरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर यंदाही पुन्हा एकदा काही नवीन पॅनल्ससह जे. कृष्णमूर्ती यांच्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. कुसुमाग्रज स्मारक, विद्या विकास सर्कल, गंगापूररोड येथे दि. १४ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, दि. १५ व १६ रोजी सकाळी १० ते १२ वा. आणि सायं. ५ ते ८.३० या वेळात सदर प्रदर्शन पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गंभीर प्रश्नाचा शोध घेणारे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात वाचकांसाठी जे. कृष्णमूर्तींची पुस्तकेदेखील उपलब्ध आहेत, असे कृष्णमूर्ती अभ्यास मंडळाने पत्रकाद्वारे कळविले आहे.
जे. कृष्णमूर्ती यांनी संपूर्ण जीवन, मानवाच्या आंतरिक स्थितीविषयी त्यांना झालेले अंतर्ज्ञान सर्व मानव जातीला समर्पित केले. जगभरात प्रवास करून हजारो श्रोत्यांशी संभाषण केले, संवाद साधला तसेच लेखन केले. त्यांच्या साहित्याची तरुण पिढीला ओळख व्हावी, असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.