जाधव खुनातील नागरे बंधूंना जन्मठेप
By admin | Published: September 20, 2016 02:07 AM2016-09-20T02:07:35+5:302016-09-20T02:08:00+5:30
सिडकोतील घटना : भांडणाच्या कुरापतीतून झाला खून
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून सिडकोतील पंडितनगर झोपडपट्टीतील सागर दत्तू जाधव (१८) या युवकाचा चाकू व तलवारीने खून करणारे आरोपी संजय अशोक नागरे व राजू अशोक नागरे या दोघा भावांना अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी सोमवारी (दि़१९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ या शिक्षेनंतर या आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालय आवारात सुमारे तीन तास गोंधळ घातला़, तर यातील एका आरोपीने पोलिसाच्या हातातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़
पंडितनगर झोपडपट्टीतील जाधव व नागरे हे एकमेकांच्याशेजारी असून, वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाले होते़ २५ जुलै २०१४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुमन दत्तू जाधव (४५) या किराणा दुकानात जात होत्या़ त्याचवेळी त्यांचा मुलगा सागर जाधव हा कामावरून घराकडे येत होता़ अश्विनी किराणा दुकानाजवळून सागर जात असताना त्यास अडवून आरोपी मंदाबाई अशोक नागरे (५२) हिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़
यानंतर नागरे कुटुंबातील अशोक देवराम नागरे (५६), संजय अशोक नागरे (२७), विजय अशोक नागरे (२४), राजू अशोक नागरे (२५), गणेश रमेश नागरे (१८) व नाना भिला सानप (वय ४३, सर्व राहणार पंडितनगर झोपडपट्टी, सिडको) यांनी सागर जाधव यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली़ या मारहाणीनंतर राजू नागरे याने चाकूने, तर संजय नागरे याने तलवारीने वार केल्याने सागर जाधव जबर जखमी झाला़ त्यास नागरिकांनी परिसरातील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़
या प्रकरणी सुमन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नागरे कुटुंबातील सहा जणांसह नाना सानपविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एच. मोरे यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये १८ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपींविरुद्ध सबळ पुरावे आढळल्याने राजू व संजय नागरे या दोघांना जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कारावास, तर अशोक, विजय, गणेश व मंदाबाई यांना दीड वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली़ यातील नाना सानप यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली़ (प्रतिनिधी) आरोपींचा तीन तास गोंधळन्यायालयाने आरोपी नागरे कुटुंबीयांना दुपारच्या सुमारास शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या पोर्चमध्ये सुमारे तीन तास चांगलाच गोधळ घातल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़ न्यायालयाच्या बाहेरच आरोपींनी पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तर काही जण भिंतीवर डोके आपटून मोठ-मोठ्याने रडत होते़ प्रोसिक्युशन सेलने सरकारवाडा पोलीस ठाण्यास गोंधळाची माहिती दिल्यानंतर मोठा संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़बंदूक हिसकावण्याचा केला प्रयत्न
न्यायालयाने आरोपी नागरे कुटुंबीयांना शिक्षा सुनावल्यानंतर संतप्त झालेल्या काही आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला़ परंतु पोलिसांनी वेळीच हा प्रयत्न उधळून लावून आरोपींना ताब्यात घेतले़ न्यायालयात आरोपींनी घातलेल्या या गोंधळाबाबत वरिष्ठांना माहिती दिली असून, त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल़
- एस़ एम़ वाघ,
सहायक पोलीस निरीक्षक, प्रोसिक्युशन सेल, नाशिक़