जाधव, पाण्डेय यांचा नाशिक रोडला पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 11:54 PM2021-03-20T23:54:49+5:302021-03-21T00:44:36+5:30
नाशिक रोड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि.२०) संध्याकाळी उशिरा महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अचानकपणे पाहणी दौरा केला.
नाशिक रोड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि.२०) संध्याकाळी उशिरा महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अचानकपणे पाहणी दौरा केला.
दोन्ही आयुक्तांनी नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात कारवाईचा हिसका दिला. स्थानक परिसरातील भगत हॉटेलमध्ये आयुक्त जाधव गेले असता, त्यांना ग्राहकांनी सुरक्षित अंतर राखल्याचे आढळून आले नाही, त्यामुळे त्यांनी हॉटेल चालकाला पाच हजाराचा दंड ठोठावला. नियमांचे पालन न केल्यास हॉटेल अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचा इशाराही यावेळी दिला. येथील राधिका हॉटेलमध्ये प्रतिबंधित प्लास्टीक वापरले जात असल्याने संचालकाला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
तत्पूर्वी जाधव, पाण्डेय यांनी बिटको कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. बिटको रुग्णालयात लवकरच सुरू होत असलेल्या कोविड टेस्टिंग लॅबलाही भेट दिली. शहर व परिसरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत आयुक्त जाधव यांनी तीव्र चिंता व्यक्त करून नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले. शहरात करोना रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला आणि नागरिकांनी निष्काळजीपणा कायम ठेवला, तर आरोग्य यंत्रणाही अपुरी पडेल, असेही जाधव म्हणाले.