जगद्गुरु महंत हंसदेवाचार्य यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:07 PM2019-02-23T23:07:32+5:302019-02-24T00:00:29+5:30
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून हरिद्वारकडे परतत असताना कानपूरजवळील उन्नाव-देवखरी गावाजवळ झालेल्या अपघातात हरिद्वार येथील जगन्नाथधामचे प्रमुख आणि रामावत संप्रदायाचे अध्वर्यू जगद्गुरु रामानंदाचार्य महंत हंसदेवाचार्यजी महाराज यांचे शुक्रवारी (दि. २२) सकाळी निधन झाले.
नाशिक : प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून हरिद्वारकडे परतत असताना कानपूरजवळील उन्नाव-देवखरी गावाजवळ झालेल्या अपघातात हरिद्वार येथील जगन्नाथधामचे प्रमुख आणि रामावत संप्रदायाचे अध्वर्यू जगद्गुरु रामानंदाचार्य महंत हंसदेवाचार्यजी महाराज यांचे शुक्रवारी (दि. २२) सकाळी निधन झाले. शनिवारी (दि.२३) हरिद्वार येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अग्निसंस्कार करण्यात आले. नाशिक येथे सन २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांनी सहभागी होत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
त्यांच्या निधनाने समस्त साधू समाजात शोककळा पसरली. जगद्गुरु रामानंदाचार्य हंसदेवाचार्य महाराज हे राम मंदिराबाबत नेहमीच आग्रही राहिले. धर्मसंसदेचे ते प्रमुख होते. दोन महिन्यांपूर्वीच दिल्लीत झालेल्या धर्मसंसदेचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ते निकटचे स्नेही होते. प्रयागराजचा कुंभमेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. शैव-वैष्णव साधू समाजात त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा.
नाशकात शोकसभा
नाशिक विरक्त साधू समाजाच्या वतीने महंत हंसदेवाचार्यजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत रामकिशोर शास्त्री, महंत भक्तिचरणदास महाराज, रामनारायणदास महाराज फलाहारी, महंत कृष्णचरणदासजी महाराज, नरसिंहदासजी महाराज, राजारामदास महाराज, लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामस्नेहिदास महाराज, भगवानदास महाराज आदींसह साधू-महंतांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कुंभमेळ्यातील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.