जगतापच्या पोलीस कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 01:41 AM2022-02-26T01:41:38+5:302022-02-26T01:42:38+5:30
कापडणीस दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राहुल जगताप याच्या व्हाईस सॅम्पल तपासणीसाठी, तसेच त्याच्याकडून ४७ लाख रुपयांची रिकव्हरी करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) जगताप याच्या पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करीत जगतापच्या पोलीस कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
नाशिक : कापडणीस दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राहुल जगताप याच्या व्हाईस सॅम्पल तपासणीसाठी, तसेच त्याच्याकडून ४७ लाख रुपयांची रिकव्हरी करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) जगताप याच्या पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करीत जगतापच्या पोलीस कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित यांच्या खून प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार राहुल जगताप यास नाशिक शहर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने जगताप याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कालावधीत पोलीस चौकशीत राहुल जगताप याने कापडणीस पिता-पुत्राचा खून कधी व कसा केला, याचा थरार सांगितला असला तरी अद्याप या प्रकरणातील सबळ पुरावा म्हणून पाहिले जात असलेला कापडणीस यांचा मोबाईल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. त्यामुळे या मोबाईलसह अन्य पुरावे शोधण्यासोबतच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, अथवा जगताप याला आणखी कोणी गुन्ह्यात मदत केली, या बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी सत्यता पडताळणीसाठी जगतापला पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने जगताप याची पोलीस कोठडी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना जगतापच्या विरोधातील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप मिळाल्या आहेत. पोलिसांना त्या परीक्षणासाठी पाठवायच्या आहेत. शिवाय, पोलिसांनी जगतापकडून ४७ लाख रुपये रिकव्हर केले असून, आणखी ४७ लाख रुपये रिकव्हर करायचे आहेत. त्यासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.