जय हनुमान ज्ञान गुणसागर... जय कपिस तिहूूॅ लोक उजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:33 PM2020-04-08T23:33:48+5:302020-04-08T23:34:11+5:30
वाके : चैत्र पौर्णिमेला येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नित्य मारुती स्तोत्राचे पठण करीत ...
वाके : चैत्र पौर्णिमेला येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नित्य मारुती स्तोत्राचे पठण करीत सकाळी सूर्योदयाच्या वेळी मारुती आरतीच्या गजरात पाळणा हलवून हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर भजनी मंडळाने मंदिरात ठरावीक सुरक्षित अंतर ठेवूनच मूर्ती अभिषेक, तेलमिश्रित शेंदूर लावून मंदिर परिसरात सॅनिटायझर, केवडा, चमेली, अंबर, गुलाबजल शिंंपडून एकानेच महाआरती केली.
जमावबंदी असल्याने मंदिरात गर्दी न करता भजनी मंडळाच्या निवडक सदस्यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नव्हता. हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाधर कानडे, त्रंबकेश्वर बच्छाव, शांताराम कानडे, दिगंबर कानडे, मधुकर बच्छाव, केदा महाराज, समाधान बच्छाव, राजेंद्र बच्छाव, दिगंबर बच्छाव, संदीप बच्छाव, पौरोहित्यकार चंद्रकांत कुलकर्णी, दादाजी गोसावी, शिवाजी कानडे आदींनी यावेळी सहकार्य
केले.
अंदरसूलला हनुमान चालिसा पठण
अंदरसूल येथे साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. मंदिरामध्ये हनुमान चालिसा पठण, पूजा व आरती करण्यात आली. दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सोशल डिस्टन्सिंग पाळून पूजा-आरती करण्यात आली.
कोरोनाच्या नायनाटासाठी आराधना
खेडलेझुंगे येथे कोरोनामुळे खेडलेझुंगे व परिसरातील सण आणि उत्सवांनादेखील फटका बसलेला आहे. हनुमान जयंती घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करत साजरी केली. योगीराज तुकाराम बाबा स्मारक मंदिरात संस्थानचे उत्तराधिकारी रघुनाथबाबा खेडलेकर व तुकारामबाबा भक्त परिवारातर्फे नागरिकांना येथे न येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सर्वांनी घरीच हनुमान जयंती साजरी केल्याचे दिसून आले. तर मारुतीच्या मूर्तीपुढे कोरोना विषाणूच्या नायनाटासाठी आराधना करण्यात आली.
मालेगावसह परिसरात धामधुमीला विराम
मालेगाव येथील संगमेश्वरासह परिसरात यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रथमच हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. दरवर्षी असणारी भाविकांची गर्दी आणि मंदिराची सजावट, विद्युत रोषणाई यंदा दिसून आली नाही. खबरदारी म्हणून सर्वच धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. यंदा प्रथमच मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला. येथील सांडवा पूल परिसरात दरवर्षी भरणारी सप्तशृंगी देवीची यात्रा भरली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात धार्मिक विधीही झाले नाहीत.