आधाराश्रमाच्या ‘जाई-जुई’ अमेरिकेत फुलणार
By admin | Published: May 30, 2017 12:55 AM2017-05-30T00:55:25+5:302017-05-30T00:55:36+5:30
नाशिक : निष्ठूर स्त्रीने अवघ्या बारा दिवसांच्या जुळ्या स्त्री जातीच्या अर्भकांना शहरातील एका रुग्णालयाबाहेर सोडून पोबारा केल्याची घटना गतवर्षी जुलैमध्ये उघडकीस आली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संतती सुख लाभले मात्र त्या निष्ठूर स्त्रीने अवघ्या बारा दिवसांच्या जुळ्या स्त्री जातीच्या अर्भकांना शहरातील एका रुग्णालयाबाहेर सोडून पोबारा केल्याची घटना गतवर्षी जुलैमध्ये उघडकीस आली होती. नऊ महिन्यांपासून या निरागस जुळ्या मुलींचे आधाराश्रमात जाई व जुई नाव ठेवून संगोपन सुरू होते. त्यांना न्यूयॉर्क शहरातील ख्रिस्तोफर व तारा हिटगर या दाम्पत्याचे पालकत्व लाभले आहे.
स्वेच्छेने असो किंवा सासरच्या दबावाखाली येऊन अथवा इतर कारणाने त्या अज्ञात स्त्रीने जरी पोटच्या गोळ्यांना वाऱ्यावर सोडून दिले तरी नियतीने मात्र अवघ्या नऊ महिन्यांतच नाशिकच्या आधाराश्रमात वाढणाऱ्या ‘जाई-जुई’ या जुळ्या बहिणींच्या झोळीत थेट अमेरिकेचे पालकत्व टाकले. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ‘जिसका कोई नहीं उसका तो खुदा हैं यारो...’ या गीताच्या ओळी सहज ओठावर येतात. आधाराश्रमाला आपला लळा लावणाऱ्या जाई-जुई मंगळवारी (दि.३०) अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या दिशेने रवाना झाल्या.