धोका पत्करून परप्रांतीयांचा ‘जय महाराष्ट्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:51 PM2020-05-09T22:51:44+5:302020-05-10T00:45:14+5:30
नाशिक : मुंबईसह अन्य भागांतून पायपीट करीत मूळ गावी जाणाऱ्यांना ट्रकचालकांनी हात दिला आणि शनिवारी (दि.९) हजारो परप्रांतीयांनी त्यातून प्रवास करीत महाराष्ट्र’चा निरोप घेतला. अर्थात, ट्रकमध्ये आणि टपावर बसून अत्यंत धोकादायक प्रवास सुरू असताना पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.
नाशिक : मुंबईसह अन्य भागांतून पायपीट करीत मूळ गावी जाणाऱ्यांना ट्रकचालकांनी हात दिला आणि शनिवारी (दि.९) हजारो परप्रांतीयांनी त्यातून प्रवास करीत महाराष्ट्र’चा निरोप घेतला. अर्थात, ट्रकमध्ये आणि टपावर बसून अत्यंत धोकादायक प्रवास सुरू असताना पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करून एकाच ट्रकमध्ये खच्चून सर्व जण बसून प्रवास करीत होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग गावागावात पोहोचण्याची भीती आहे. लॉकडाउन आणि संचारबंदी वाढत गेली आणि ती वाढण्याची शक्यता अधिक असल्याने रोजगाराची चिंता तर आहेच, परंतु कोरोनामुळे आता घराकडे जाण्याची ओढ वाढली आहे. मात्र गावाकडे जाण्यासाठी बस आणि रेल्वे अशी कोणतीही साधने नसल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर याभागातून शेकडो परप्रांतीय नागरिक पायपीट करीत जात आहेत. उन्हा तान्हात लेकराबाळांसह जत्थ्याने जाणारे हे नागरिक नाशिकमार्गे जाताना दुपारी काही वेळ सावलीत विश्रांती घेतात आणि परत गावाकडे जातात, तर काहीजण रणरणत्या उन्हात जाण्याऐवजी रात्रीच्या वेळी प्रवास करतात. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना अडविले मात्र आता सर्रास ते गावाकडे जात असतात. औरंगाबाद येथील रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर तर आता यंत्रणा अशा धोकादायक प्रवासापेक्षा सरळमार्गाने गावी जात असतील तर बरे अशा भूमिकेप्रत आली आहे. शनिवारी (दि.९) त्याचे प्रत्यंतर आले.
मुंबईकडून भल्या पहाटे रिक्षा आणि सायकल तसेच पायपीट करीत निघालेले मजूर इगतपुरीपर्यंत येत असताना अक्षरक्ष: वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईकडून येणारी अनेक वाहने त्या लोंढ्यांमुळे अडकली, तर दुसरीकडे या नागरिकांनी मालट्रकने प्रवास करण्याची तयारी दर्शविल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडथळे आणले नाही.
मालट्रकच्या टपावर आणि मागेदेखील अत्यंत कोंबून बसलेले हे नागरिक धोकादायक पद्धतीने प्रवास करीत होते. त्यात मास्क तर कोणाकडे नव्हतेच, शिवाय फिजिकल डिस्टन्सिंग नव्हते. काही जण तर टपावर बसून प्रवास करीत होते. त्यामुळे अत्यंत धोकादायक चित्र होते. नाशिक शहरात द्वारका भागातदेखील सर्रास ट्रकमध्ये बसवून नागरिकांना नेले जात होते.
--------
परप्रांतीय सुसाट, निवारागृह रिते
लॉकडाउननंतर जिल्ह्याच्या सीमासिल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात आणि शहरात येणाºया मजुरांना पकडून निवारागृहात पाठविले जात होते. परंतु सुमारे दोन हजार इतकी संख्या झाल्यानंतर पोलिसांनी मजुरांना अडविले नाही की जिल्हा प्रशासनाने त्यांना निवारागृहात घेतलेले नाही.