चंपाषष्ठीनिमित्त जय मल्हारचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:50 AM2019-12-03T01:50:52+5:302019-12-03T01:51:10+5:30
यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत भंडारा उधळत परिसरातील श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
नाशिकरोड : यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत भंडारा उधळत परिसरातील श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
चंपाषष्ठीनिमित्त देवळालीगाव राजवाडा येथील श्री शिवमल्हार मंदिरात सकाळी रवींद्र राजाराम भालेराव दाम्पत्याकडून अभिषेक, पूजा, महाआरती करण्यात आली. प्राचीन असलेल्या या मंदिरात खंडेराव भक्त मेसुरामबाबा यांनी १८२९ मध्ये जिवंत समाधी घेतली असून, चंपाषष्ठीला त्यांचीदेखील पूजा केली जाते. तसेच श्री खंडोबा महाराजांच्या भाला-चिमटा यांचीदेखील पूजा करण्यात आली. चंपाषष्ठीनिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई व मंडप टाकण्यात आला होता. दुपारपर्यंत भाविकांनी भाकरी-भरीतचा नैवेद्य दाखविण्यास गर्दी केली होती. दिवभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
देवळालीगाव श्री अण्णा भाऊ साठेनगर येथील खंडेराव मंदिराला चंपाषष्ठीनिमित्त रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे आल्हाट कुटुंबीयांनी श्री खंडोबा महाराजांची काठी व घरातील देव निफाड तालुक्यातील चांदोरी येथे भेटीसाठी नेले होते. तेथे काठीची विधिवत पूजा करून नवीन कपडे, झेंडे रीतीरिवाजानुसार लावण्यात आले. तेथून आणलेली काठी सकाळी १० वाजता दुर्गा देवी मंदिरात आणण्यात आली व तेथून वाजत-गाजत भंडाऱ्याची उधळण करत देवळालीगाव अण्णा भाऊ साठेनगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. मंदिरात महाभिषेक, आरती व पूजा सोमनाथ केरू आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळी भाकरी-भरीतचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी अंबादास आल्हाट, कैलास आल्हाट, अमोल आल्हाट, किरण डहाळे, किसन बस्ते, बाळू वाघमारे, कैलास गायकवाड आदींसह भाविक उपस्थित होते.
गाडेकर मळा येथील श्री खंडेराव महाराज व श्री कानिफनाथ महाराज मंदिरात रवींद्र गाडेकर यांनी सपत्नी पूजा व आरती केली. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सर्व मंदिरांमध्ये भाविक यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करत भंडाºयाची उधळण करत दर्शनासाठी येत होते.