सापाशी खेळताना व्हिडीओ सोशल मीडियावर टाकाल तर कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 02:47 PM2022-10-31T14:47:40+5:302022-10-31T14:51:29+5:30
सापाशी खेळ करतानाचे व्हिडिओ सर्रासपणे सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत अशाप्रकारचे कृत्य गंभीर स्वरुपाचा गुन्हा ठरतो.
नाशिक - अलिकडे सोशल मीडियाची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत चालली आहे. लाइक्स, शेअर व कमेंट्ससाठी सोशल मीडियावर तरुणाईकडून 'रिल्स' चा पाऊस पाडला जात असून यामध्ये काही सर्प मित्र सुद्धा आघाडीवर असल्याचे दिसून येते. सापाशी खेळ करतानाचे व्हिडिओ सर्रासपणे सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत अशाप्रकारचे कृत्य गंभीर स्वरुपाचा गुन्हा ठरतो. यामुळे वनविभागाच्या कचाट्यात अशा व्यक्ती सापडू शकतात. या कायद्यान्वये कारावास व दंडाची शिक्षाही भोगावी लागू शकते.
सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी व आपल्या परिचित व अपरिचित व्यक्तींपुढे मिरविण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी अनेकदा विचार करणे गरजेचे आहे. सापांसोबत छायाचित्र, व्हिडिओ काढणे हेच बेकायदेशीर आहेत. त्यामुळे असे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित केल्यास त्या गुन्ह्याचे स्वरुप अधिक तीव्र होत जाते. त्यामुळे वन्यजीव कायद्यांतर्गत अशी व्यक्ती शिक्षेला पात्र ठरते. कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी करण्यापूर्वी वन्यजीवांच्या संरक्षणाचा विचार प्रामुख्याने करायला हवा, अन्यथा वनविभागाकडून कठोर कारवाई केली जाऊ शकते. यापूर्वी देखील अशाप्रकारच्या सोशल मीडियावर हिरोगिरी करणाऱ्यांची वनखात्याकडून चांगलीच जिरवण्यात आली होती. केवळ शहरातच नाही. तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाच्या वन अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येते.
काय आहे वन्यजीव संरक्षण कायदा?
>> भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ हा केंद्रीय कायद्यांतर्गत वन्यजीवांना संरक्षण देण्यात आले आहेत. अनुसूची मधील (शेड्यूल-१, २, ३ आणि ४) संरक्षित वन्यजीवांना जवळ बाळगणे, त्यांना हानी पोहचविणे, त्यांचे अवशेष कुठल्याही उद्देशाने जवळ ठेवणे, अवशेषांची विक्री करणे, शिकार करणे, प्रदर्शन करणे आदी सर्व प्रकारच्या कृती या कायद्याने गंभीर गुन्हा आहे.
>> हा कायदा जसा वन्यप्राण्यांना संरक्षण देतो तसेच वनस्पती प्रजातींच्या ही संरक्षणासाठी लागू होतो. कोणत्याही वन जमिनीतून किंवा कोणत्याही संरक्षित क्षेत्रातील वृक्ष संपदेला हानी पोहचविणे ही गुन्हा ठरतो.
शिक्षा काय?
वन्यजीवांना धोका पोहोचविणारी कृती करताना आढळून आल्यास वनखात्याकडून अशा व्यक्तींविरुद्ध वन्यजीव कायद्याने वन गुन्हा दाखल केला जातो. अशा व्यक्तींना अटक करून न्यायालयात हजर केले जाते. वन गुन्ह्याच्या तपासाकरिता वनअधिकारी यांना संशयित आरोपींची वनकोठडी न्यायालयाकडून दिली जाते. पोलिसांप्रमाणे दोषारोपपत्र देखील न्यायालयात दाखल केले जाते.
सोशल मीडियावर स्टंटबाजी आवरा
सोशल मीडियावर सापांसह अन्य कोणत्याही प्रकारच्या वन्यजीवांची स्टंटबाजी आवरण्याची गरज आहे. विविध प्रकारचे सर्प हाताळताना किंवा त्यांना रेस्क्यू करताना मोबाइलमध्ये अथवा कॅमेऱ्याने चित्रीकरण करणे बेकायदेशीर ठरते. सर्पासोबतचे छायाचित्र अथवा कुठल्याही प्रकारचे त्यांच्यासोबतचे जीवघेणे स्टंट हे बेकायदेशीर आहे. यामुळे वनविभागाने आता अलर्ट जारी केला आहे. सोशल मीडियावर स्टंटबाजी करणाऱ्यांवर वनखात्याने लक्ष केंद्रित केले आहे.