कारागृह-पोलिसांत वाद; कैद्यांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:50 AM2018-07-22T00:50:46+5:302018-07-22T00:51:08+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गेल्या महिन्याभरापासून पोलीस पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे आजारी कैद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारागृह प्रशासन व शहर पोलीस यांच्यातील वादामुळे आजारी कैदी त्रस्त झाले आहेत.
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गेल्या महिन्याभरापासून पोलीस पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे आजारी कैद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारागृह प्रशासन व शहर पोलीस यांच्यातील वादामुळे आजारी कैदी त्रस्त झाले आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ३११८ पुरुष व ६० महिला अशी एकूण ३१७८ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र आजच्या मितीस ३४२७ पुरुष व १२३ महिला असे एकूण ३५५० कैदी कारागृहात आहेत. त्यामध्ये १२०० पुरुष व ४७ महिला न्यायाधीन कैदी आहेत. तसेच महिला कैद्यांची ८ मुलेदेखील आहेत. कारागृहातील रुग्णालयात १ एमबीबीएस, १ बीएएमएस व औषधे देण्यासाठी १ कम्पाउंडर आहे. १ कम्पाउंडरची जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहे. वयोवृद्ध व विविध आजारांनी ग्रस्त कैद्यांची संख्या लक्षात घेता कारागृहातील रुग्णालय अत्यंत तोकडे आहे. एक्स-रे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी अशी कुठलीही सुविधा नसल्याने कारागृहातील आजारी कैद्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, धुळे, औरंगाबाद, मुंबईच्या रुग्णालयात पाठविले जाते. कारागृहाच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार, रक्ताच्या चाचण्या, असे मर्यादितच उपचार केले जात आहेत. कैद्यांना कारागृहाबाहेर न्यायालय, रुग्णालय अथवा इतर कारागृहात नेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कैदी पार्टी (पोलीस) उपलब्ध करून देतात. इंग्रज काळापासून असलेली परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे. याकरिता नाशिक शहर पोलीस मुख्यालयाकडे कारागृह संबंधित कामासाठी ७० अधिकारी, कर्मचारी राखीव आहेत. मात्र गेल्या जून महिन्यापासून पोलीस मुख्यालयाकडून आम्ही कैदी ताब्यात घेणार नाही. कारागृह कर्मचारी कैद्याला घेऊन येईल आम्ही फक्त संरक्षण देऊ, अशी भूमिका घेतल्याने कारागृह व पोलीस प्रशासनात वाद निर्माण झाला आहे. तसेच रुग्णालयात कैद्याला नेण्यासाठी कैदी पार्टीची मागणी केल्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात कैदी पार्टी उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अधिक उपचाराची नितांत गरज असलेल्या आजारी कैद्यांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकावेळी विविध आजारांचे कैदी उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवायचे असतात. त्यांचे उपचाराचे कक्ष वेगवेगळे असल्याने प्रत्येक कैद्यासोबत स्वतंत्र कारागृह कर्मचारी पाठविणे अशक्य आहे. मात्र आजपर्यंत सुरू असलेल्या कैदी पार्टी प्रथेला पोलीस मुख्यालयाकडून छेद देण्यात येत असल्याने वयोवृद्ध व आजारी कैद्यांची हेळसांड होत आहे.
मात्र कैद्याला रुग्णालयात नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याशिवाय कैदी ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कैदी पार्टीने घेतली. अखेर आजारी कैद्यांना रुग्णालयात दाखल न करता कैदी पार्टी परत निघून गेल्याचे वृत्त आहे. तर शुक्रवारी जिन्यावरून पडून जखमी झालेला कैदी, दम्याचा रुग्ण कैदी व अॅनिमिया आजाराने ग्रस्त झालेला कैदी, एचआयव्हीग्रस्त कैदी अशा चौघा कैद्यांना अधिक उपचाराची अधिक गरज असल्याने कारागृह कर्मचाºयांनी रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
कारागृह प्रशासनावर काही कैद्यांना मुद्दाम जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात येत असल्याचा आरोप होत असतो. ‘अर्थपूर्ण’ व्यवहारामुळे काहीवेळा हा आरोप खरा ठरतो. मात्र कारागृह प्रशासन व पोलीस मुख्यालयातील अंतर्गत कलगीतुºयामुळे खरोखर अधिक उपचाराची गरज असलेल्या वयोवृद्ध किंवा आजारी कैद्याच्या जिवाशी खेळले जात आहे.
गृहखात्याने लक्ष देण्याची गरज
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची संख्या व विविध आजारांची लागण झालेले कैदी बघता कारागृहातील रुग्णालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच कारागृहाच्या कामासाठी शहर मुख्यालयात नियुक्त केलेले ७० अधिकारी व पोलिसांची संख्या तोकडी पडत आहे. त्यामुळे कैद्यांना न्यायालयात, रुग्णालयात नेताना अडचणी निर्माण होत आहे. पोलीस आयुक्तालयाकडून कारागृह कामासाठी कर्मचारी वाढविण्याच्या पाठविलेल्या प्रस्तावावर गृहखात्याने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.