जेलरोड मोरे मळा येथील बाप-लेक जागीच ठार
By admin | Published: October 6, 2016 12:42 AM2016-10-06T00:42:32+5:302016-10-06T00:43:02+5:30
टँकर-कार यांच्यात अपघात
नाशिक : राजूर फाटा येथे स्विफ्ट कारने गॅस टँकरला पाठीमागून दिलेल्या धडकेत जेलरोड परिसरातील बाप-लेक संपत कारभारी खांगळ (५५) व त्यांचा मुलगा जगदीश संपत खांगळ (२८, रा़ जेलरोड, बालाजीनगर, मोरे मळा, नाशिकरोड) हे जागीच ठार झाल्याची बुधवारी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे लासलगाव तालुक्यातील रहिवासी असलेले संपत खांगळ हे मुंबईतील एमटीएनएलमध्ये कामास आहे़ मुंबईला कामानिमित्त आलेला त्यांचा मुलगा जगदीशसोबत ते स्विफ्ट डिझायर कारने (एमएच २०, बीयू ७८३६) मुंबईहून नाशिकला येत होते़ दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास मुंबई महामार्गावरील राजूर फाट्याजवळील गांधीनगर पेट्रोलपंपाजवळ गॅस टँकरला स्विफ्ट कारने पाठीमागून जोरात धडक दिली़ या भीषण दुर्घटनेत संपत व जगदीश खांगळ या बाप-लेकाच्या डोके, चेहरा, छातीस जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले़ त्यांना तेथील स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी नरेंद्राचार्य महाराज अॅम्ब्युलन्समधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़
मयत संपत खांगळ यांचा एक मुलगा नौसेनेत असून, त्यांच्या आजारी पत्नीस एक दिवसापूर्वीच दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले होते़ दरम्यान, या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ या दुर्दैवी घटनेत बाप-लेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)