जेलरोडला २६ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:21 AM2018-12-29T00:21:50+5:302018-12-29T00:22:42+5:30
राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा २६ लाखांचा गुटका गुजरातवरून आयशर ट्रकमधून पुण्याला जात असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड नारायणबापूनगर चौकात पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला.
नाशिकरोड : राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा २६ लाखांचा गुटका गुजरातवरून आयशर ट्रकमधून पुण्याला जात असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड नारायणबापूनगर चौकात पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. राज्यात विक्री व खाण्यास बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा गुजरातवरून नाशिकरोड जेलरोडमार्गे पुण्याला जात असल्याची गोपनीय माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळाली. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास रायते यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड नारायणबापूनगर चौकात पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, सतीश जगदाळे, हवालदार सुनील कोकाटे, प्रजित ठाकूर, अण्णा कुंवर, राहुल खांडबहाले, दीपक पवार यांनी सापळा रचला. यावेळी आगरटाकळी कडून येणारा आयशर ट्रक (जीजे २७ व्ही ९२९१) सापळा रचलेल्या पोलिसांनी थांबविण्यास सांगताच ट्रकचालकाने अगोदरच ट्रक उभा करून धूम ठोकली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारच्या गुटख्याचे पोते दिसून आले. अन्न व औषध प्रशासन विभागाला पोलिसांनी कळविल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, प्रमोद पाटील, किशोर बाविस्कर, गुलाबसिंग वसावे हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. ट्रकमध्ये सुगंधित तंबाखूच्या एकूण ६८ गोण्या मिळून आल्या. राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला २५ लाख ९३ हजारांचा गुटका व आयशर ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरला उपनगर नाक्यावर उपनगर पोलिसांनी ४१ लाख ६५ हजारांचा गुटका जप्त केला होता.
नाशिकमार्गे जातो गुटखा
राज्यात विक्री व खाण्यासाठी बंदी असलेला गुटखा पुणे, नगर व इतर भागात पाठविण्यासाठी गुजरातवरून नाशिकमार्गे जात असल्याचे उघड झाले आहे. ट्रकचालक पळून गेल्याने गुटखा कोणी पाठविला व कोणाकडे जात होत हे गूढ गुलदस्त्यात आहे. मात्र जप्त केलेला आयशर ट्रकमालकाचा शोध लागल्यानंतर गुटखा विक्रीचे रॅकेट उघड होईल.