जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:50 AM2017-07-29T01:50:02+5:302017-07-29T01:50:02+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन खोल्यांमध्ये सुरू असलेले लघुवेतन कर्मचारी संघटनेचे अजिज शेख यांचे कार्यालय हटवावे, कार्यालयाचे थकलेले १४ लाख रुपयांचे भाडे वसूल करावे, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्ष उज्ज्वला कराड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि़ २८) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले़
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन खोल्यांमध्ये सुरू असलेले लघुवेतन कर्मचारी संघटनेचे अजिज शेख यांचे कार्यालय हटवावे, कार्यालयाचे थकलेले १४ लाख रुपयांचे भाडे वसूल करावे, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्ष उज्ज्वला कराड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि़ २८) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले़ जिल्हा रुग्णालयातील दोन खोल्यांमध्ये अजिज शेख यांचे लघुवेतन कर्मचारी संघटनेच्या नावाने कार्यालय सुरू आहे़; मात्र ही संघटनाच बेकायदेशीर असल्याने या दोन्ही खोल्या काढून घेण्यात याव्यात तसेच या खोल्यांचे भाडे वसूल करावे, महिला कर्मचाºयांना सन्मानाची वागणूक द्यावी यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले़ विशेष म्हणजे यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करणाºया कराड यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता़ चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू करताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन सरकारवाडा पोलिसांना लेखी पत्र दिले आहे़ या पत्रात येत्या सोमवारी (दि़ ३१) जिल्हा रुग्णालयातील लघुवेतन कर्मचारी संघटनेचे कार्यालय रिकामे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे़ जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर महिला आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले़