जैन अलर्ट ग्रुपतर्फे आदिवासी पाड्यांना दैनंदिन वस्तंूचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:31 AM2019-05-22T00:31:52+5:302019-05-22T00:32:42+5:30
अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले
नाशिक : अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
आचार्य श्री हेमरत्नसुरीवरजी यांच्या मार्गदर्शनासाठी जैन अलर्ट ग्रुपच्या देशभरातील शाखांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असे उपक्रम राबविताना समाजातील वंचित घटकांना मदत दिली जाते. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गाव आणि वाड्यांत पाणी नाही. हाताला रोजगार नाही. अनेक ठिकाणी तर रोजगार आणि पाण्यासाठी आदिवासींना स्थलांतर करावे लागत आहे. धुळे आणि चाळीसगावच्या दरम्यानदेखील सुमारे एक हजार कुटुंबांना अशाच प्रकारे साहित्य वाटप करण्यात आले. सरसंचालक राजन पारीख, अभिजित शहा, धर्मेश बारोट, पलक मेहता, दिनेश जोशी, जीन शहा यांच्यासह अनय पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे या पाड्यांवरील नागरिकांना मद्य व मांसाहार वर्ज्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
जीवनावश्यक वस्तूंचा समावेश
पेठ- हरसूलजवळील मानकापूर, गावंद, शिंगदरी, चिऱ्यांचा पाडा, डोंगरशेत तसेच रायतळे या भागात तर दोन वेळेसच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या मुंबईच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील आदिवासी पाड्यांना अडीचशे दैनंदिन साहित्याचे वाटप करण्यात आले.