जैन समाज सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर ; दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:37 AM2018-11-22T00:37:28+5:302018-11-22T00:38:16+5:30
श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ, म्हसरूळ येथे धर्मार्थ दवाखाना आणि स्मार्ट पाठशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.
नाशिक : श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ, म्हसरूळ येथे धर्मार्थ दवाखाना आणि स्मार्ट पाठशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. स्मार्ट पाठशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांनी सांगितले की, जैन समाज हा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुलांचे ज्ञान संवर्धन आणि संस्कार प्रबोधन यासाठी सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट पाठशाळेद्वारे लहान मुलांवर चांगले संस्कार होऊन त्याद्वारे नवीन पिढी अधिक सक्षमतेने तयार होण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील ९० टक्के जिल्हा परिषदेच्या शाळा आज डिजिटल झाल्या आहेत. तेथे त्यांना डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे. भुसे यांनी गजपंथ तीर्थक्षेत्राच्या या स्तुत्य उपक्र माचे कौतुक करून सांगितले की, भविष्यात या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तसेच अशा प्रकारच्या स्मार्ट पाठशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू कराव्यात, असेही भुसे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी श्री गजपंथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्राचे विश्वस्त तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजपंथ जैन मंदिर म्हसरूळ येथे धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या दवाखान्याच्या माध्यमातून म्हसरूळगाव व आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी व अत्यल्प दरात औषधोपचार अशा सुविधा देण्यात येणार आहे. तसेच अनेक साप्ताहिक चेकअप कॅम्पही आयोजित करण्यात येणार आहे. ही सुविधा गरजू लोकांसाठी खूप उपयोगाची आहे. यामुळे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे उद्बोधन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.