जैन संघटनेचे युवती सक्षमीकरणाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:07 AM2019-11-13T00:07:00+5:302019-11-13T00:07:33+5:30
कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करण्याची ताकद स्मार्ट गर्ल कार्यशाळेत आहे. विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवावा व सशक्त समाजनिर्मितीकरिता कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा,
नाशिक : कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करण्याची ताकद स्मार्ट गर्ल कार्यशाळेत आहे. विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवावा व सशक्त समाजनिर्मितीकरिता कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे राज्य प्रभारी व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर साखला यांनी केले. भारतीय जैन संघटनेची (बीजेएस) कार्यकर्ता संपर्क सभा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब (जालना), राज्य सचिव रत्नाकर महाजन (हिंगोली), राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक चोपडा, प्रतापमल बाफणा (मालेगाव), राज्य मार्गदर्शक प्रफुल्ल पारख, सुनील चोपडा, पंकज पटणी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
साखला म्हणाले, भारतीय जैन संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल, महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान अंतर्गत सुजलाम सुफलाम उपक्रम, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता मूल्यवर्धन अभ्यासक्रम, विवाहेच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन, व्यवसाय विकास कार्यशाळा, अल्पसंख्याक समाजाचे अधिकार व जागरूकता, जलसंवर्धन आणि चारा छावण्याबाबत मोठ्या प्रमाणात काम झाले आहे.
शांतीलाल मुथा यांच्या विचारातून नवीन भारत निर्माण करण्याच्या संकल्पनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले. यावेळी राज्यभरातील गाव, तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्या संपर्क निर्देशिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय अध्यक्ष यतीश डुंगरवाल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र मास ललित सुराणा, गोटू चोरडिया, सतीश बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.