जाखोरी, नागोसली ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:14 AM2021-04-27T04:14:27+5:302021-04-27T04:14:27+5:30
पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार हा सार्वजनिक सेवांच्या सुधारण्यासाठी त्याचबरोबर पंचायतराज संस्थांनी केलेल्या चांगल्या कामासाठी दिला जातो. या ...
पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार हा सार्वजनिक सेवांच्या सुधारण्यासाठी त्याचबरोबर पंचायतराज संस्थांनी केलेल्या चांगल्या कामासाठी दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत असे असते.
नाशिक जिल्ह्यातील १३८५ ग्रामपंचायतींनी नामांकनात सहभाग नोंदवल्यानंतर अंतिम दहा ग्रामपंचायतीतून जाखोरी व नागोसली या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. हा पुरस्कार मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात यंदाच्या वर्षीदेखील मानाचा तुरा रोवला आहे. जाखोरी गावात सरपंच मंगला युवराज जगळे व ग्रामसेवक उत्कर्ष पाटील यांनी गावकऱ्यांना सोबत घेत रानमळ्यातील गाळ काढत नाल्यांची आणि बंधाऱ्यांची स्वच्छता केली. यामुळे पाणी अडवले जाऊन शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. यासह गावातील युवकांना वाचनालय, गावकऱ्यांना पिण्यासाठी आर.ओ.चे पाणी, आपले सरकार ई-सेवा केंद्राद्वारे गावकऱ्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत नोंदणी या विविध आघाड्यांवर काम केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील नागोसली हे गाव शहराच्या मुख्यालयापासून ४५ किमीवर अतिदुर्गम ठिकाणी आहे. या गावात काही वर्षांपूर्वी मूलभूत सोयी सुविधा या मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. परंतु आता गावातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीएसआर फंडातून शाळेची इमारत बांधण्यात आली. गावातील लोकांच्या सोयीसाठी आपले सरकार ई- सेवा केंद्र सुरू करण्यात आले .यामध्ये गावातील सरपंच आशा तुकाराम गिऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांची मोलाची मदत लाभल्याचे ग्रामसेवक एस. पी. मार्कंडे यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा परिषदेत आयटी कक्षात जाखोरी व नागोसली गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून या पुरस्काराचा स्वीकार केला, यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी हे उपस्थित होते.
(फोटो २६ झेडपी)