पहिल्याच पेपरला २० कॉपी प्रकरणे परीक्षा दहावीची : सर्वाधिक प्रकार जळगावमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:29 AM2018-03-02T01:29:26+5:302018-03-02T01:29:26+5:30
नाशिक : इयत्ता दहावीच्या पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला नाशिक विभागातून २० विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत.
नाशिक : इयत्ता दहावीच्या पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला नाशिक विभागातून २० विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३ विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील असून, नंदुरबारमधून पाच, तर धुळे येथून दोन विद्यार्थी कॉपी करताना पकडण्यात आले. परीक्षा मंडळाच्या शिस्त कारवाईनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. विभागातून एकूण एक लाख ७६ हजार विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा पेपर दिला. महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाºया इयत्ता दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषा विषयाचा पेपर विभागातील ४३२ केंद्रांवर घेण्यात आला. विभागातील नाशिक जिल्हा केंद्र वगळता उर्वरित तीनही केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षेत गैरप्रकार करताना पकडण्यात आले. पुढीलवर्षी नवीन अभ्यासक्रम लागू होणार असल्याने जुन्या अभ्यासक्रमानुसार ही विद्यार्थ्यांची अखेरची परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेविषयी विद्यार्थी अधिक जागरूक असल्याचे बोलले जात असतानाच मराठी विषयाच्या परीक्षेतही विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. परीक्षेच्या नवीन नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज पहिलाच पेपर घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर हजर होणे अपेक्षित असल्याने सकाळपासूनच विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर गर्दी झाली होती. पालक आणि विद्यार्थी यांची गर्दी झाल्याने शाळांच्य परिसरात पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर उशिरा वर्गात येणाºया विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नसल्याचा नवा नियम असल्यामुळे विद्यार्थी वेळीच केंद्रात उपस्थित झाले होते. शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरला कलाटणी देणारी असल्याचे मानले जात असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकही दहावीविषयी प्रचंड जागरूक असतात. त्यामुळे आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर सोडविण्यासाठी आलेल्या पालकांची संख्या सर्वच केंद्रांवर दिसून आली.