जालना-नगरसूल पॅसेंजर शिर्डीपर्यंत धावणार
By admin | Published: June 4, 2017 01:35 AM2017-06-04T01:35:51+5:302017-06-04T01:37:35+5:30
मनमाड : नगरसूल जालना पॅसेंजर ही गाडी मनमाडमार्गे साईनगर शिर्डी या स्थानकापर्यंत धावणार असल्याने दक्षिण व मध्य रेल्वेच्या प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : नगरसूल जालना पॅसेंजर ही गाडी मनमाडमार्गे साईनगर शिर्डी या स्थानकापर्यंत धावणार असल्याने दक्षिण व मध्य रेल्वेच्या प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस सदरची गाडी या मार्गावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या डेमू गाडीचा आज शुभारंभ करण्यात आला. या गाडीचा विस्तार वाढवल्याने मनमाड येथे येण्यासाठी सचखंड व तपोवन एक्स्प्रेसमधील गर्दीवर काही प्रमाणात आळा बसणार आहे.
मराठवाड्यातील प्रवाशांना उत्तर भारतात तसेच मुंबईकडे जाण्याकरिता मनमाड जंक्शन स्थानकावर पोहचण्यासाठी सध्या नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेस व नांदेड मुंबई तपोवन एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर अवलंबून रहावे लागते. या मार्गावर गाड्यांची संख्या कमी असल्याने या दोन्ही गाड्यांना प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नगरसूल -जालना पॅसेंजर गाडी चालविण्यात येते. ही गाडी जालना येथून सुटून नगरसूल येथे पोहचते तसेच नगरसूल येथून जालन्याकडे रवाना होते. ही गाडी सुमारे आठ तास नगरसूल रेल्वेस्टेशनवर उभी असते. तसेच सचखंड व तपोवन एक्स्प्रेसवरील प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होणार आहे. सदरच्या गाडीचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी भुसावळ मंडल रेल उपभोक्ता समिती सदस्य तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे व नारायण पवार यांनी दक्षिण रेल्वेच्या वाणिज्य प्रबंधकाकडे पत्रकाद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन गाडीचा विस्तार करण्यात आला असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.