ठाणगाव येथे म्हाळुंगी नदीचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 05:56 PM2019-07-07T17:56:10+5:302019-07-07T17:56:41+5:30
ठाणगाव : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मुख्य जीवनदायिनी समजली जाणारी म्हाळूंगी नदी प्रवाहित होऊन नदीचे पाणी रविवारी (दि.७) रोजी सकाळी ठाणगाव पर्यंत पोहचले. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथून जाणारी म्हाळूंगी नदीला या वर्षी प्रथमच पाणी आल्याने ग्रामस्थांच्यावतीने जलपूजन करण्यात आले.
म्हाळूंगी नदीचा उगम असणाऱ्या विश्रामगड परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस असल्याने म्हाळूंगी नदी प्रवाहित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ठाणागावचे माजी सरपंच नामदेव शिंदे, उत्तम शिंदे, सचिन रायजादे, रामदास भोर, विजय काकड, काशिनाथ शिंदे, संदेश साळुंखे, विनोद आंबेकर आदीनी एकत्र येत म्हाळूंगी नदीवर जाऊन नदीचे पूजन करून नदीस नारळ अर्पण करण्यात आले. कमी पावसातही नदी प्रवाहित झाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. सतत दोन दिवस पावसाचे प्रमाण असेच राहीले तर म्हाळूंगी नदी मोठ्या प्रमाणात वाहू लागेल. ठाणगाव परिसरात रिमझिम पाऊस पडत असल्याने म्हाळूंगी नदी वाहू लागली पण उंबरदरी धरणात पाण्याची वाढ झालेली दिसत नाही. धरणात पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. येथे व परिसरात या रिमझिम पावसाने शेतीच्या कामांना वेग येणार आहे.