आडगावच्या भूमिपुत्राचा जम्मू-काश्मीरमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:51 AM2020-01-09T00:51:28+5:302020-01-09T00:52:19+5:30
आडगाव येथील भूमिपुत्र व सीमा सुरक्षा दलाच्या ३१ बटालियनचे हवालदार आप्पासाहेब मधुकर मते (३६) यांचे जम्मू-काश्मीरमध्ये अतिउंचीवर कर्तव्य बजावताना प्राणवायू अपुरा पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता बुधवारी (दि. ८) धडकताच परिसरात शोककळा पसरली.
आडगाव : येथील भूमिपुत्र व सीमा सुरक्षा दलाच्या ३१ बटालियनचे हवालदार आप्पासाहेब मधुकर मते (३६) यांचे जम्मू-काश्मीरमध्ये अतिउंचीवर कर्तव्य बजावताना प्राणवायू अपुरा पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता बुधवारी (दि. ८) धडकताच परिसरात शोककळा पसरली.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हिवाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असून, आप्पासाहेब यांचे पार्थिव नैसर्गिक वातावरण निवळताच विमानाने मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. २००५ साली ते सैन्याच्या सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. ते ३१ बटालियनमध्ये हवालदार पदावर सेवा बजावत होते. श्रीनगरमध्ये रक्त गोठविणारी हिमवृष्टी अंगावर झेलत आप्पा हजारो फूट उंचीवरील सीमेवर पहारा देत होते. मंगळवारी (दि.७) प्राणवायू अपुरा पडल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी ही वार्ता सैन्यदल व जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे बंधू भगीरथ यांना समजताच मते कुुटुंबीयांवर दु:खचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दहा वर्षांचा मुलगा प्रतीक, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.
दोन दिवसांपूर्वीच घेतली होती ‘गुड न्यूज’
आप्पासाहेब यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्नी मनीषा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. यावेळी घरात लवकरच बाळ येणार असल्याची ‘गुड न्यूज’ त्यांच्या पत्नीने त्यांना दिली. मागील महिन्यात आप्पा पंधरवड्याची सुटी घेऊन घरी आले होते.
आप्पांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी केटीएचएममधून पूर्ण केले. बारावीची परीक्षा कला शाखेतून उत्तीर्ण केल्यानंतर ते सैन्यात दाखल झाले. लहानपणापासून व्यायामाची आवड व चुलत आजोबांकडून मिळालेले कुस्तीच्या डावांचे बाळकडू घेतले होते. कराटेमध्येही आप्पांनी ‘ब्लॅकबेल्ट’ मिळविला होता.