मधुकर शिरसाठ यांना जमनाबेन लोकसेवक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:58 PM2018-03-11T23:58:01+5:302018-03-11T23:58:01+5:30
मालेगाव : आज सत्य आणि अहिंसा ही सर्वोदयाची मूल्ये जपण्याची आवश्यकता आहे. सज्जन शक्ती एकत्र आल्याशिवाय दुर्जनांचा मुकाबला करता येत नाही. मधुकर शिरसाठ यांचे कार्य अद्वितीय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांनी केले.
मालेगाव : आज सत्य आणि अहिंसा ही सर्वोदयाची मूल्ये जपण्याची आवश्यकता आहे. सज्जन शक्ती एकत्र आल्याशिवाय दुर्जनांचा मुकाबला करता येत नाही. मधुकर शिरसाठ यांचे कार्य अद्वितीय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांनी केले.
येथील कॅम्पातील रेवाबाग येथे महाराष्टÑ गो-विज्ञान समितीतर्फे देण्यात येणारा जमनाबेन लोकसेवक पुरस्कार धुळ्याचे मधुकर शिरसाठ व मालती शिरसाठ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नेमाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहन सराफ होते. व्यासपीठावर शंभू पाटील, गो-विज्ञान समितीचे कोषाध्यक्ष जितूभाई कुटमुटिया, डॉ. सुगन बरंठ, सचिव संजय जोशी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर आदि उपस्थित होते.
यावेळी भालचंद्र नेमाडे म्हणाले, आज इतिहास चुकीचा शिकविला जातो. गांधी, विनोबा विचार प्रणाली सर्वांना जवळ घेणारी होती. ती विचार प्रणाली आपण वाढविली पाहिजे. गरिबी-श्रीमंती यात मोठ्या प्रमाणात दरी वाढते. दरी वाढल्याने हिंसा वाढते.
जगात सर्वात हिंसक आपला देश समजला जातो ही लाज वाटणारी गोष्ट आहे. वैश्विकीकरणामुळे देशाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे. गरजा वाढत चालल्याने गुन्हेगारी वाढत चालली आहे. प्रारंभी शंभू पाटील यांनी नेमाडे यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर माई पाटील, श्री. व सौ. शिरसाठ, शिवचरण ठाकूर आदिंचा सत्कार करण्यात आला. संजय जोशी यांनी प्रास्तविक केले. विजय कळमकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
यावेळी शिरसाठ यांना नेमाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ५१ हजार रूपये रोख, शाल, ट्रॉफी, प्रमाणपत्र व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सूत्रसंचालन डॉ. अपश्चिम बरंठ यांनी केले.शंभू पाटील यांना कार्यकर्ता पुरस्कारभालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते शंभू पाटील यांना कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंभू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जळगावचे किशोर कुलकर्णी यांनी मधुकर शिरसाठ यांच्या कार्याविषयी तयार केलेली डाक्युमेंट्री दाखविण्यात आली. नचिकेत कोळपकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.