वैकुंठ रथाच्या धर्तीवर आता मुस्लीम समाजासाठी जनाजा रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:50 AM2019-06-23T00:50:25+5:302019-06-23T00:50:42+5:30
मृत व्यक्तीला त्याच्या राहत्या घरापासून अमरधामपर्यंत नेण्यासाठी शववाहिकांबरोबरच वैकुंठरथ आहे. तथापि, आता मुस्लीम समाजासाठी महापालिकेकडून खास जनाजा रथदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नाशिक : मृत व्यक्तीला त्याच्या राहत्या घरापासून अमरधामपर्यंत नेण्यासाठी शववाहिकांबरोबरच वैकुंठरथ आहे. तथापि, आता मुस्लीम समाजासाठी महापालिकेकडून खास जनाजा रथदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासनाने दोन वाहने खरेदीची तयारी केली असून, त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत.
महापालिकेच्या वतीने शहरात २००१ पासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्यात येते. मात्र ती नंतर अन्य धर्मीयांसाठीदेखील लागू करण्यात आली. त्यानंतर मृत व्यक्तीच्या घरापासून अथवा रुग्णालयापासून थेट अमरधाममध्ये जाण्यासाठी सुरुवातीला केवळ महापालिकेच्या शववाहिकेचा वापर केला जात असे. नंतर वैकुंठरथाची संकल्पना पुढे आली. अनेक खासगी सेवाभावी संस्था तसेच नगरसेवकांनी त्यात पुढाकार घेतला आणि वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्यात येऊ लागले. माजी आमदार (कै.) उत्तमराव ढिकले यांनी प्रथमच आमदार निधीतून वैकुंठ रथ घेतला आणि तो महापालिकेला उपलब्ध करून दिला. वैकुंठ रथावर अधिक जागा तसेच भजन-कीर्तन लावण्याची सोय असल्याने वैकुंठ रथाची मागणी वाढली. त्यामुळे नाशिक महापालिकेनेदेखील दोन वैकुंठ रथ खरेदी केले आहेत. परंतु महापालिकेने त्या त्या समाज किंवा धर्मीयांच्या पद्धतीप्रमाणे अंत्यसंस्काराची सुविधा द्यावी, अशी मागणी वाढल्यानंतर महानुभव, लिंगायत, मुस्लीम तसेच अन्य अनेक समाजाला त्यांच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराच्या सुविधा दिल्या जातात. परंतु वैकुंठ रथाच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठीदेखील जनाजा रथ उपलब्ध करून द्यावा, ही मागणी होत होती.
महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये यासंदर्भात ठराव झाला असला तरी त्याला मुहूर्त लागत नव्हता. मात्र, महापालिकेने तयारी सुरू केली तर लोकसभा निवडणकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू झाली. ती संपल्यानंतर आता महापालिकेने दोन जनाजा रथांसाठी निविदा मागविल्या आहेत. २४ लाख रुपये खर्च करून दोन रथांची खरेदी करून ते आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले जाणार असल्याचे यांत्रिकी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.